मुंबई (प्रतिनिधी) : महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २ फेब्रुवारीला मांडला जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जीएसटी लागू झाल्यानंतर प्रशासनाला झालेली तूट भरुन काढण्यासाठी झोपडपट्ट्यांवर कर लावण्याची शक्यता आहे.
महापालिकेचा २०१६- २०१७ चा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींचा होता. मात्र मोठा अर्थसंकल्प मांडून देखावा करण्यापेक्षा मूलभूत सुविधा देणारा अर्थसंकल्प असे सांगत अर्थसंकल्प सादर केला होता. पूर्वीच्या बजेटपेक्षा तब्बल ११ हजार कोटी रुपयांची कपात केली. मात्र केवळ ३५ टक्केच रक्कम यातील खर्च करण्यात आली. येत्या मार्च महिन्याअखेरपर्यंत उर्वरित निधी करणे आवश्यक आहे. मागील वर्षी रस्ते दुरुस्तीवर अवघा ४ टक्के खर्च झाला होता. परंतु, यंदा ५१ टक्के, पुलांची दुरुस्तीवर ५८ टक्के मागील वर्षी फक्त १४ टक्के खर्च झाला. देवनार डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती व कचरा विल्हेवाटीसाठी १९ टक्केच खर्च झाला आहे. मागील वर्षी ३६ टक्के खर्च झाला होता. आता येत्या २ फेब्रुवारीला मांडला जाणाऱ्या अर्थसंकल्पात काय तरतूदी असतील, याकडे लक्ष आहे.