मालाड,(निसार अली ): ‘हमारा फाउंडेशन ‘ संस्था गेली ती 32 वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा फाउंडेशन संस्था (मुंबई) व बटरफ्लाईज संस्था (दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने 16 एप्रिल रोजी ‘ ब्लू अम्ब्रेला डे ‘ मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात आली. ‘ मुलांचे लैंगिक शोषण ‘ या संवेदनशील विषयावर समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे तसेच मुलींप्रमाणे मुलांवर देखील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध समाजभान निर्माण करणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
संस्थेचे लाभार्थी मुले व त्यांच्या कुटुंबीयांना या विषयावर माहिती देण्यात आली. मुलांच्या सहभागातून बनविलेल्या पोस्टर,घोषणा यांच्या माध्यमातून या विषयावर आधारित एक ‘ ध्वनीचित्रफित ‘ तयार करण्यात आली. त्याद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. मुंबई-महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत ही मोहीम राबविण्यात आली.
हमारा फाऊंडेशन द्वारे या जनजागृती मोहिमेकरिता चाऊस शेख व अरुण अवघडे यांनी विशेष योगदान दिले. याकरिता संस्थेच्या संस्थापक विश्वस्त आशा राणे व व्यवस्थापिका श्रद्धा चोणकर यांचा भक्कम पाठिंबा मिळाला.