तरुण वयात आपल्याला एखादा आजार झाला आहे हे मान्य करणे अनेकांना फार कठीण जाते. मान्य केलेच तरी त्याबद्दल काहीही उपाय करण्याचे अनेकदा टाळले जाते. पण अशा दुर्लक्ष करण्यामुळे, टाळाटाळीमुळे अनेकदा सहज बरा होऊ शकणारा आजार बळावत जातो. फार पूर्वी रक्तदाबाचा त्रास चुकुनच एखाद्याला व्हायचा. काही काळानंतर परिस्थिती बदलली आणि हा उतार वयातील किंवा पन्नाशी नंतरचा आजार म्हंटला जायला लागला. पण आज आपल्याला जगभरात विशी आणि तिशीतील तरुणांमध्ये रक्तदाबाचा त्रास दिसू लागला आहे.
निरोगी माणसाचा रक्तदाब १२०/८० असायला हवा. हा वरचा आकडा १२० ला systolic blood pressure आणि खालचा आकडा ८० ला diastolic blood pressure असे म्हणतात.
हा रक्तदाबाचा वरचा आकडा म्हणजे हृदय आकुंचन पावून हृदयातून ऑक्सिजन मिश्रित स्वच्छ रक्त जेव्हा शरीराकडे पाठवले जाते तेव्हा ते किती दाबाने पाठवले जाते [systolic blood pressure] आणि रक्तदाबाचा खालचा आकडा म्हणजे ते शुद्ध रक्त शरीराकडे पाठवल्यानंतर हृदय जेव्हा शिथिल होऊन कार्बनडाय ऑक्साईड मिश्रित अशुद्ध रक्त जेव्हा शरीराकडून स्वीकारत असते तेव्हा असलेला दाब [ diastolic blood pressure].
आणि जेव्हा हे आकडे १४०/९० ला पोहोचतात तेव्हा आपण रक्तदाबाचा [hypertension / high blood pressure] त्रास सुरु झाला असे म्हणतो.
१२०/८० ते १४०/९० च्या मध्ये कुठेही जर हे आकडे राहत असतील तर त्याला pre hypertension असे म्हंटले जाते.
आज तरुणांमध्ये वयाच्या विशीत आणि तिशीत रक्तदाबाचा त्रास सुरु होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. सुरुवातीला अनेकदा ह्या त्रासाची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत. म्हणून ह्याला silent killer असेही म्हणतात. पण सतत रक्तदाब जास्त राहिल्याने ह्रदयावर ताण येतो. त्यामुळे मग पुढे हृदयाचे विकार सुरु होण्याची शक्यता वाढते. रक्तवाहिन्यांमध्ये calcium जमा होऊन रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे,किडनीवर ताण येऊन किडनीचे आजार सुरु होणे, मेंदूला नीट रक्तप्रवाह न मिळाल्याने लकवा येणे, डायबिटीस होणे, लैंगिक जीवनात कमजोरी किंवा अडथळे येणे, आंधळेपणा येणे, घोरणे, sleep apnea म्हणजे झोपताना श्वास घेण्यात अडथळा येणे असे अनेक आजार दुर्लक्षित रक्तदाबामुळे होऊ शकतात.
काही वर्षापूर्वी अमेरिकेत २४ ते ३२ वयोगटातील १४००० स्त्री, पुरुष नागरिकांवर झालेल्या एका रिसर्चप्रमाणे त्यांच्याकडे ५ मधील १ ला रक्तदाबाचा त्रास आहे.
रक्तदाबाचा त्रास सुरु होण्याची अनेक करणे आहेत. पण ही जवळजवळ सर्व करणे ‘बदललेले राहणीमान’ ह्या महत्वाच्या घटकाकडे बोट दाखवताना दिसतात. ही आपल्या फायद्याची बाब आहे. कारण राहणीमानात फरक करून, शरीरास उपयुक्त राहणीमान स्वीकारून, आपल्या राहणीमानातील चुका सुधारून आपण ह्या आजाराला सहज आटोक्यात आणू शकतो.
आपला रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी काही उपाय –
१] रोजच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश करावा. घरचे सकस जेवण जेवावे.
२] आपल्या रोजच्या आहारातून saturated fats ना काढून टाकावे. तळलेल्या, जड पडणाऱ्या पदार्थांमध्ये, जंक फूड मध्ये हे fats मोठ्या प्रमाणावर असतात.हवाबंद प्लॅस्टिक मधील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
३] दिवसभरातील मिठाच्या वापरावर थोडा आळा ठेवावा. रक्तदाब खूप नसेल तर मीठ पूर्ण बंद करण्याची गरज नाही पण कमी नक्की करावे.
४] रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी वजन कमी करणे फार गरजेचे असते. शरीराचा स्थूलपणा जितका वाढत जातो तितकाच हृदयावरचा ताण आणि रक्तदाबाचा त्रास वाढत जातो. तुमच्या डॉक्तरांना विचारून तुमच्या उंची आणि वयाप्रमाणे तुमचे वजन किती असले पाहिजे हे जाणून घ्या.
वजन आणि उंची ह्याच्या गुणोत्तराला BMI [ body mass index] असे म्हणतात. तुमचा BMI १८.५ ते २४.९ च्या मध्ये असणे जरुरी आहे. पण फक्त वजनावर भर देऊन पुरेसे नाही तर शरीरातील fats आणि स्नायूचे प्रमाण देखील योग्य असणे महत्वाचे आहे. शिकागो मधील जॉईन्त न्याशनल कमिटीच्या रिपोर्टप्रमाणे [JNC 7] १० किलो वजन कमी करून वरचा रक्तदाबाचा आकडा [systolic blood pressure ] ५ ते २० अंकांनी कमी करता येऊ शकतो.
५] दररोज शारीरिक व्यायामासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. रोज कमीतकमी एक तास चालणे, धावणे, नाच करणे, पोहणे, एखादा आवडीचा मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे.
६] रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी दारू सिगरेट किंवा इतर कोणत्याही उत्तेजनात्मक ड्रगस चे सेवन बंद किंवा अगदी कमी करावे.
तरुणांमध्ये रक्तदाबाचा आजार जितक्या झपाट्याने वाढतो आहे तो तितक्याच सहज आटोक्यात आणता येऊ शकतो गरज आहे ती फक्त सजगपणे जगण्याची. स्वतःवर, आपल्या जीवनावर आणि आपल्या माणसांवर पुरेसे प्रेम करण्याची. कारण आपण आजारी पडून स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी दुखःच ओढवून घेतो. हि सजगता बाळगली तर रोजच्या राहणीमानात करायचे बदल सहज जमून येतील
– डॉ. आस्मिता सावे, रिजॉइस वेलनेस