मुंबई – चेंबूर-माहुल येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरीमधील हायड्रो-कॅकर युनिटमधील बॉयलरचा बुधवारी (ता. ८ ) प्रचंड तीव्रतेचा स्फोट झाल्याने ४५ जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.घटनास्थळी “एचपीसीएल’, “बीएआरसी’, “आरसीएफ’, माझगाव डॉक आणि मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात होत्या. रिफायनरीत दुपारी २.३० वाजताच्या सुमारास हायड्रो-कॅकर युनिटमध्ये स्फोट झाला. त्यामुळे शेजारील माहुलगाव, गवाणपाडा, कॅलिको गावात खळबळ उडाली. रिफायनरीमधील काही विभागांच्या काचा फुटल्या. स्फोटामुळे काही कामगार दूरवर फेकले गेले, तर एक पत्र्याचा तुकडा मागील बाजूस एक किलोमीटर अंतरावर पडला होता.स्फोटाची माहिती कळताच परिसरातील रहिवाशांनी “बीपीसीएल’च्या प्रवेशद्वारावर गर्दी केली. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता “एचपीसीएल’, “बीएआरसी’, “आरसीएफ’, माझगाव डॉक आणि महापालिकेच्या अग्निशमन गाड्या रवाना झाल्या. काही वेळातच बचावकार्याला सुरवात झाली. “बीपीसीएल’च्या प्राथमिक उपचार केंद्रात उपचार केल्यानंतर २२ जखमींना घरी सोडण्यात आले. तसेच, २३ जखमींना चेंबूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अनेकांच्या हाताला, खांद्याला इजा झाली आहे.