Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोविड विरोधातील लढ्यास नुकतंच एक आगळं- वेगळं आणि अद्वितीय बळ लाभलंय. यासाठी निमित्त ठरलंय ते “सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे” या शब्दांसह आणि सुमधुर स्वरात सर्व जगाच्या मंगलाची कामना करणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांनी केलेल्या कौतुकाचं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘जंबो कोविड’ रुग्णालय येथे गेले वर्षभर अहोरात्र पद्धतीने कोविड रुग्णांची सेवा केली जात आहे. याची दखल आता दस्तुरखुद्द भारतरत्न लता मंगेशकर यांनी घेतली असून त्यांनी शाबासकीची थाप देणारे एक पत्रच जंबो कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांना नुकतेच पाठविले आहे. विशेष म्हणजे लतादीदींनी हे पत्र आपल्या हस्ताक्षरात लिहून पाठविले आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जंबो कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांना पाठविलेल्या पत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नमूद केले आहे की, “आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करत आहात. ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते…”. लतादीदींच्या कौतुक भरल्या व शाबासकीची थाप देणाऱ्या या पत्रामुळे आम्हा सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने रुग्णसेवा करण्याचे बळ मिळाले आहे, अशी नम्र भावना डॉक्टर डेरे यांनी यानिमित्ताने आवर्जून व्यक्त करत भारतरत्न लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १८ मे २०२० रोजी ‘एम.एम.आर.डी.ए.’ने उभारलेल्या या कोविड समर्पित रुग्णालयाचे बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत या रुग्णालयात अव्याहतपणे कोविड बाधितांची सेवा व त्यांच्यावर आवश्यक ते औषधोपचार केले जात आहेत. गेल्या वर्षभरात या रुग्णालयात साधारणपणे २२ हजार इतक्या कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर याच ठिकाणी कार्यरत असलेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रात नियमितपणे लसीकरण करण्यात येत असून आजवर सुमारे २ लाख ५० हजार लशीच्या मात्रा याठिकाणी देण्यात आल्या आहेत.
अत्यंत अल्पावधीत उभारण्यात आलेल्या या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात तब्बल २ हजार २०८ खाटा (बेड) आहेत. यामध्ये ८६८ ऑक्सीजन बेड असून १२० अतिदक्षता रुग्णशय्या (ICU Beds) यांचा समावेश आहे. याचबरोबर ६७ रुग्णशय्यांना ‘व्हेंटिलेटर सपोर्ट’ देखील आहे. या व्यतिरिक्त ज्या कोविड बाधित रुग्णांना नियमितपणे डायलिसिसची गरज असते, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून त्यासाठी १२ रुग्णशैय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दिवसाचे २४ तास व आठवड्याचे सातही दिवस यानुसार साधारणपणे ३७८ डॉक्टर्स, ३९९ परिचारिका व ५१३ वैद्यकीय कर्मचारी (वॉर्डबॉय) कार्यरत आहेत. याचबरोबर रुग्णालयाच्या इतर व्यवस्थेसाठी २०० कर्मचारी कार्यरत असून १५२ सुरक्षारक्षक देखील सुरक्षेच्या दृष्टीने तैनात आहेत. तसेच या रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका देखील सदोदित कार्यतत्पर आहेत.