बलिया (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धोरणे राबविली जातील आणि मागास प्रवर्गांसाठी असणारे आरक्षण पूर्णपणे काढून टाकले जाईल, अशी भीती बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी व्यक्त केली. बलिया जिल्ह्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची प्रचारसभा झाली, यावेळी त्यांनी भाजपावर हल्ला चढविला. आरक्षण संपविण्यासाठी भाजपा करत असलेले कारस्थान विश्वसनीय सूत्रांकडून मला समजलेले आहे, असा गौप्यस्फोटदेखील त्यांनी केला.
भाजपाने अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी उत्तर प्रदेशात चेहरा दिलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मतमोजणीचे निकाल जाहीर होताच समाजवादी पक्ष वेंटिलेटरवर जाईल आणि त्यात काही कमी पडल्यास त्यांचे काका शिवपाल पूर्ण करतील, असे म्हणत मायावती यांनी अखिलेश यांची खिल्ली उडविली.
दरम्यान, या आधीही मायावती यांनी नरेंद्र मोदी आणि आणि समाजवादी पक्षावर तीव्र शब्दात टीका केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. अजुनही मतदारांना भुलवण्यासाठी आशादायक चित्र भाजपा रंगवत आहे, असा आरोप मायवती यांनी हरसंन गावातील प्रचारसभेत केला होता.