मुंबई, दि. 26 : ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठेवल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मुलुंड टोल नाक्यावर भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करुन चक्का जाम केला.
ओबीसी कें सन्मान में भाजपा मैदान में… असा नारा देत ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. मनोज कोटक, आ. मिहीर कोटेजा, पराग शहा, पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, निल सोमय्या, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, रजनी केणी, जागृती पाटील आदींंसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठाण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक रोखत हे आंदोलन करण्यात आले. अखेर पोलिसांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक केली व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे मराठा समाजाचे आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. जोपर्यंत दोन्ही आरक्षणे दोन्ही समाजाला मिळत नाही तो पर्यंत भाजपा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. आज पासून या संघर्षाला सुरुवात झाली. यापुढे जर आंदोलन चिघळले तर त्याला ठाकरे सरकार सर्वस्वी जबाबदार असेल. ओबीसी आरक्षणाला विरोधात ज्या दोघांनी याचिका केली ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे काँग्रेस ओबीसी आरक्षणावरुन समाजाला फसवते आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये मानाचे स्थान कसे? याचा उत्तर ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी द्यायला हवे, अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला.