मुंबई : भाजपाला पराभूत करणे हा शिवसेना-काँग्रेसचा एकच अजेंडा आहे. या दोन पक्षांनी एकमेकाला पूरक असे उमेदवार उभे करून मॅच फिक्सिंग केले आहे. अशा ४२ जागा आपण नक्की सांगू शकतो. हा शिवद्रोह, मुंबईद्रोह व महाराष्ट्र द्रोह आहे. पण तुमच्या मॅच फिक्सिंगने आमचा पराभव होऊ शकत नाही. भाजपाची ताकद असलेल्या जागा तर जिंकूच शिवाय मॅच फिक्सिंग केलेल्या जागाही आम्ही जिंकू. पारदर्शी कारभाराचा अजेंडा असल्याने भाजपा निवडणूक जिंकणारच आहे, असे मुंबई भाजपा आमदार अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला आज ठणकावले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटला. यावेळी शेलार बोलत होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणार्या १०५ हुतात्म्यांच्या स्मारकाला वंदन करून प्रचाराचा शुभारंभ झाला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. भाई गिरकर, खा. गोपाळ शेट्टी, खा. किरीट सोमय्या, आमदार योगेश सागर, तमिळ सेल्वन, मनिषा चौधरी तसेच उपमहापौर अलका केरकर यावेळी उपस्थित होते. दानवे यांनी उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाच्या विरोधात युद्ध सुरू केले म्हणून, मुंबईला लुटणाऱ्या कंत्राटदारांना तुरुंगात टाकले. मुंबई पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले म्हणून त्या पक्षाने आमची साथ सोडली, असा आरोपही शेलार यांनी केला.
राज्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला आहे. त्याचप्रमाणे महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा नंबर वन ठरेल. भाजपा सरकारचे काम आणि पक्षाचा अजेंडा याच्या जोरावर जनतेसमोर जाऊन महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक जिंकायची आहे, असे दानवे यांनी सांगितले. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार देण्यासाठी स्वबळावर निवडणूक जिंकायची आहे. निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती व्हावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले पण युती करणार नाही अशी एकतर्फी घोषणा त्यांनी केली, असेही दानवे म्हणाले.