रत्नागिरी, प्रतिनिधी : भाजप नेते किरीट सोमय्या आज रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड दौऱ्यावर आले होते. शिवसेनेच्या नेत्यांच्या अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात आज किरीट सोमय्या आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील बंगल्याची त्यांनी आज पाहाणी केली. याठिकाणी जाऊन मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत सोमय्या यांनी इथे सेल्फी देखील काढला.
अनधीकृत बांधकाम संदर्भात केंद्रीय ग्रीन ट्रिबुनर मध्ये खटला दाखल केल्याची माहिती यावेळी सोमय्या यांनी दिली. या खटल्याच्या सुनावलीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री ऍड. अनिल परब यांचे अनाधिकृत रिसॉर्ट आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत असल्याचा दावा किरीट सोमय्या पहिल्यापासून करीत आले आहेत. अनधिकृत बांधकामासंदर्भात ग्रीन ट्रिबुनर मध्ये अतिरिक्त अफीडेव्हीट दाखल करण्यासाठी प्रत्यक्ष या अनाधिकृत बांधकामाची पाहाणी करण्यासाठी आपण इथे आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.
दरम्यान CRZ कायद्याचे उल्लंघन करुनही पालकमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट आणि उद्धव ठाकरे यांचे सचिन मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावरती कारवाई का झाली नाही, यावरून किरीट सोमय्या आक्रमक झालेले पाहायला मिळाले. किरीट सोमय्या यांनी थेट मुरुडची ग्रामपंचायत गाठली आणि इथल्या ग्रामसेवक यांना या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले. त्यानंतर थेट तहसीलदार कार्यालय गाठत किरीट सोमय्या यांनी तहसीलदार यांना यावर कधी कारवाई होणार यासाठी त्यांनासुद्धा धारेवर धरले.