डोंबिवली : पावसाळ्यात रोगराईला वाव मिळू नये म्हणून प्रभागातील सफाई करण्यासाठी पाठपुरावा करुन सुध्दा जर साफसफाई होत नसेल तर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील ‘फ’ प्रभाग कार्यालयाच्या दालनात येत्या 20 जुलै रोजी कचरा आणून टाकणार असल्याचा गंभीर इशारा भाजप नगरसेवक स्नेहल-साई शेलार यांनी दिला आहे. याबाबत अंतीम स्मरण पत्र डोंबिवली विभागाचे आरोग्य निरिक्षकांना साई शेलार यांनी दिले आहे.
नगरसेवक साई शेलार यांनी पावसाळा काही दिवसावर असताना प्रभागातील साचणाऱ्या कचऱ्याबाबत ‘फ’ प्रभाग कार्यालयास कळविले होते. परंतु या मागणीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. वेळोवेळी वेगवेगळी कारणे देउन दुर्लक्ष करण्यात आले आहे. कधी कामगार कमी असल्याचे कारण दिले जाते तर कधी अन्य काही. गेल्या 15-20 दिवसात भरपूर पाउस पडल्याने व जागोजागी साफसफाई न झाल्याने नाले-गटारे तुडुंब भरलेले दिसत आहेत. नव्वद फुटी रस्त्यावरचे मंगेशी डेझल, भोईरवाडी येथील सार्वजनिक शौचालय येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आढळून येत आहे. विविध भागातील नागरिक साठलेल्या कचऱ्याबाबत तक्रारी करत आहेत.
नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध साथीचे रोग पसरण्याची भिती नागरिक व्यक्त करित आहेत. त्यामुळे 19 जुलैपर्यंत प्रभागात साफसफाई न झाल्यास 20 जुलै रोजी ‘फ’ प्रभाग कार्यालयात कचरा टाकण्यात येईल असा इशारा साई शेलार यांनी दिला आहे.