रत्नागिरी, (आरकेजी) : ‘आपण नक्की जिंकू शकतो’ अशी मानसिकता ठेवून कामाला लागा. सद्यस्थितीत घराणेशाही जपणार्या पक्षांची ताकद कमी होऊ लागली आहे. त्यामुळे भाजपला हरवण्याची ताकद कोणामध्ये नाही, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मंत्री व रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी केले.
भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांची पहिली बैठक त्यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रदेश सदस्य राजन तेली, संघटनमंत्री सतीश धोंड, अॅड. विलास पाटणे, अशोक मयेकर, अॅड. दीपक पटवर्धन, प्रा. नाना शिंदे, नीलम गोंधळी, बाबा परुळेकर, रश्मी कदम, जयदेव कदम, सचिन वहाळकर, संदीप लेले, चिपळूण नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, नीलेश भुरवणे, प्रशांत डिंगणकर उपस्थित होते. या सभेत तालुकाध्यक्ष, सरचिटणीस यांनी भाजपची ताकद किती आहे, सदस्यसंख्या, ग्रामपंचायत आदींची माहिती डॉ. मिश्रा यांना दिली. या सभेला 200 पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने विजयासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
डॉ. मिश्रा यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केला. शाल, श्रीफळ व नारळात कोरलेला गणपती भेट देऊन मिश्रा यांना त्यांनी सन्मानित केले. प्रा. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन वहाळकर यांनी आभार मानले.
या वेळी डॉ. मिश्रा यांनी काँग्रेस, शिवसेना हे पक्ष घराणेशाही जपणारे असल्याची टीका केली. या पक्षांमध्ये पहिल्या अध्यक्षांनंनतर पुढे कोण अध्यक्ष होणार हे सर्वांनाच माहिती असते. पण भाजपमध्ये कोण अध्यक्ष होईल, हे समजत नाही. कारण सामान्य कार्यकर्त्यालाही संधी दिली जाते, असे सांगितले.
घराणेशाही जपणारे पक्ष सध्या क्षीण होत चालले आहेत. त्यामुळे भाजपला हरवण्याची ताकद यांच्यात नाही. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करताना ‘आपण जिंकणारच’ अशी मानसिकता ठेवली पाहिजे, असा सल्लाही डॉ. मिश्रा यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा हे सामान्य कार्यकर्ते होते व ते सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे भारत सध्या स्वर्णीम युगात आहे. सर्वाधिक खासदार, आमदार, महापौर असलेला भाजप पक्ष असून ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सत्ता आहे.
या वेळी बाळ माने यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना बळ मिळाले पाहिजे. तसेच दोन वर्षांपासून स्वबळावर भाजप लढत असल्याने आता यश मिळू लागले आहे. भविष्यात रत्नागिरी भाजपमय करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.