मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात शनिवारी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशाबद्दल जल्लोष केला. उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यात भाजपाला दणदणीत बहुमत मिळाले तर गोवा व मणिपूरमध्ये भाजपाने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत, हे स्पष्ट होताच प्रदेश कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपा प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी, महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, प्रदेश भाजपा सचिव संजय उपाध्याय, भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे आणि नगरसेवक अतुल शाह कार्यकर्त्यांच्या उत्साही जल्लोषात सामील झाले.
दूरचित्रवाणीच्या मोठ्या पडद्यावर भाजपाचे संख्याबळ वाढलेले दिसत होते. सामना पथकाच्या ढोल वादक तरुण तरुणींनी भाजपा कार्यालयाच्या समोर ताल धरला तसा वातावरणात आणखी जोष निर्माण झाला. त्याचवेळी बँड पथक उत्साहाने गाणी वाजवत होते. फटाक्यांच्या कडकडाटात आणि वाद्यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ताल धरला असतानाच पंजाबी भांगडा नर्तक आपल्या कौशल्याने लक्ष वेधून घेत होते.