डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवलीतील जनतेला भाजपाने लोकसभा, विधानसभा आणि महापालिका माध्यमातून फसविले असून कल्याण डोंबिवलीतील जनता भाजपाला ‘जबाब दो’ असा प्रश्न विचारात आहे. केंद्र आणि राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असून जबाब दो असं राष्ट्रवादी विचारात असून सरकावर कोणाचाच विश्वास उरला नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी डोंबिवलीत केले.
‘ही कसली प्रगती ? ही तर अधोगती’ या मथळ्याखाली पुस्तिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे करण्यात आले. असुरक्षित, अर्थशून्य, अशांत, असहाय्य महाराष्ट असून विद्यमान भाजपा सरकारने चार वर्षात काहीच केले नाही हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन हॉटेल लिजेंड येथे केले होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, ग्रामीण नेते डॉ. वंडार पाटील, प्रसन्न अचलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तपासे पुढे म्हणाले, देशामधील जनतेला खोट्या आणि फसव्या घोषणा देऊन मागील काळात भाजपा सत्तेवर आला. केंद्रात मोदी पंतप्रधान झाले तर राज्यात फडणविस मुख्यमंत्री झाले. परंतु या दोघांनीही दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. आम्ही आरक्षण, रोजगार उपलब्ध करून देऊ. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र होऊ शकला नाही. आयात-निर्यात वाढवू, जीडीपी, परकीय चलन वाढवू असे म्हणणारे काहीच करू शकले नाहीत. सामन्यांची छोटे-मोठी गुंतवणूक होती ती सुद्धा नोटबंदीच्या माध्यमातून काढून घेतली. यामुळे जनतेला खूप मोठा त्रास सहन करावा लागला. कामगार-शेतकरी-व्यापारीवर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
राष्ट्रवादी तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेत भाजपच्या विरोधात व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजपच्या योजनांवर ताशेरे मारले आहेत. हमीभावाचे गाजर दाखवा निवडणुकीत मते मिळावा, कर्जमाफी निर्णयाच्या जाहिरातींवर सरकारची लाखो रुपयांची उधळण, मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले, मेक इन महाराष्ट्राचा फुगा फुटला, हा राम नाही तर रावण आहे, भाजपचे कंदील विकत घ्या पण वीज मागू नका आदी विडंबनात्मक रचना रेखाटण्यात आल्या आहेत.