मुंबई : मुंबईत आमचाच महापौर होणार, अशा वल्गना करणार्या भारतीय जनता पक्षाने आज महापौरपदाच्या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा येथे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुंबईच्या महापौरपदासह स्थायी समिती किंवा अऩ्य कुठल्याही समित्याची निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे, असे सांगितले. त्यांच्या या घोषणेमुळे शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि मुंबई शिवसेनेचीच यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबईकरांनी पारदर्शकतेच्या मुद्द्याला कौल दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तेव्हा फोडाफोडीचे राजकारण करुन महापौरपद मिळवणे ही मतदारांची फसवणूक ठरेल आणि महापालिकेत भाजपाचे नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून बसतील, असेही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला सुनावले. मुंबईसाठी उपलोकायुक्त नेमणार, असेही ते म्हणाले. पालिकेत विकासाच्या मुद्यांवर शिवसेनेला भाजपा पाठिंबा देईल असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपापेक्षा शिवसेनेच्या दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना समान कौल आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
भाजपाला मुंबईत प्रचंड यश मिळाले. ३१ वरुन ८२ पर्यंत आमच्या जागा गेल्या. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे, याचाही वारंवार पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परीषदेत केला.
>>>>