रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या अभियंता सेलच्या कोकण सहसंयोजकपदी रत्नागिरीतील प्रवीण देसाई (बी.इ. ऑटोमोबाईल) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यासू आणि दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या निवडीने अभियंता सेलला बळ मिळणार आहे.
प्रवीण देसाई यांनी यापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाच्या रत्नागिरी शहर सरचिटणीसपदी चांगली कामगिरी केली आहे. कोरोना काळामध्ये अनेकांना मदत करणे, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत, रत्नागिरीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात. बी. इ. ऑटोमोबाईल असलेले प्रवीण देसाई यांची भाजपा अभियंता सेल कोकण सहसंयोजकपदी निवड झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच भाजपाचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते नीलेश राणे, दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील तज्ञ ॲड. दीपक पटवर्धन आदी नेत्यांनी प्रवीण देसाई यांचे अभिनंदन केले.
अभियंता सेलच्या माध्यमातून सहसंयोजक म्हणून चांगली कामगिरी करू, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी राबवलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शत प्रतिशत भाजपा होण्याकरिता मदत करणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.