
गोवा | 21 डिसेंबर 2025
BITS पिलानी यांच्या के.के. बिर्ला गोवा कॅम्पसने शाश्वत साहित्य, हरित ऊर्जा आणि ग्रामीण उपजीविकेला चालना देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन संस्था, लातुर, कोकण बांबू आणि केन डेव्हलपमेंट सेंटर (KONBAC), आणि धनंजय बायोएनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, छ्त्रपती संभाजी नगर याचे समवेत देशामध्ये बांबू आधारित उपक्रमांवर एकत्रित काम करण्यासाठी धोरणात्मक सामंजस्य करार केला आहे.
राष्ट्रिय बांबू मिशन च्या उद्दिष्टांशी संरेखित बांबूला या पिकाला ऊर्जा व औद्योगिक पीक म्हणून स्थान मिळावे आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळवून देताना शाश्वत औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शेतकरी, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सरकारी संस्थांना एकत्रित करणाऱ्या व्यापक परिसंस्थेची गरज या उपक्रमातून अधोरेखित होते.
या कराराअंतर्गत बांबू-आधारित कार्बन उत्पादने, विशेष रसायने, संमिश्र व इंजिनिअर्ड साहित्य यावर संशोधन व नवोपक्रमाला चालना दिली जाईल, तसेच प्रक्रिया तंत्रज्ञान, मानके, SOPs, प्रोटोटाइप आणि पायलट-स्केल उपाययोजना विकसित केल्या जातील.
कौशल्य विकास, प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि शैक्षणिक-उद्योग संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाईल, तर ग्रामीण उद्योजकता, हरित उपजीविका आणि शाश्वत औद्योगिक परिसंस्थेला प्रोत्साहन दिले जाईल. बांबू-आधारित नवोपक्रमांचे तंत्रज्ञान हस्तांतरण आणि व्यावसायिकीकरण सुलभ करण्यासाठीही प्रयत्न केले जातील.
या सामंजस्य करारावर राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स चे कार्यकारी अध्यक्ष आणि फिनिक्स फाउंडेशन चे अध्यक्ष. पाशा पटेल, BITS पिलानी गोवा कॅम्पसचे संचालक प्रा. सुमन कुंडू , KONBAC चे संचालक संजीव कर्पे, आणि धनंजय बायोएनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी धनंजय कंदाकुरे यांनी स्वाक्षरी केली.
या करारावेळी BITS पिलानी यांच्या के.के. बिर्ला गोवा कॅम्पसचे प्रो. शिबू क्लेमेंट (आर अँड आय सहयोगी डीन) आणि प्रो. एस. डी. मांजरे (केमिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख) उपस्थित होते. या मिशन-मोड कार्यक्रमाची संकल्पना प्रो. अभिषेक शर्मा यांनी मांडली असून, प्रो. शरद आणि प्रो. मृणालिनी गायधने यांनी अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या भागीदारीमुळे भारतातील बांबू-आधारित नाविन्यपूर्ण परिसंस्थेला बळकटी मिळेल, ज्यामुळे शाश्वत तंत्रज्ञानाचा विकास, ग्रामीण आर्थिक वाढ आणि हवामान-सकारात्मक औद्योगिक प्रगती साध्य होण्यास मदत मिळणार आहे.
लोदगा येथे नापिक जमीनीवर बांबु पासुन निर्मित बायोचार चा वापर करुन जमीन सुपीक करण्याचा महत्वाकांक्षी प्रयोग राबविणार
स्वातंत्र्यापुर्वी देशातील जमीनी मध्ये कर्बाचे प्रमाण ३ टक्के होते ज्यामुळे जमीनीची सुपीकता कायम होती परंतु नंतरच्या काळात जमीनीच्या कर्बामध्ये प्रचंड प्रमाणात घट होऊन हे प्रमाण ०.२ टक्के ते ०.३ इतके कमी झालेले असल्याने परिणामी शेतीमालाच्या उत्पनावर कमालीची घट होत आहे. या वर उपाय करणे अती आवश्यक आहे.
बांबु पासुन तयार होणारे बायोचार हे जमीनी मध्ये कर्बाचे प्रमाण वाढविण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते, म्हणुन BITS पिलानी यांच्या के.के. बिर्ला गोवा कॅम्पसच्या माध्यमातुन बांबु पासुन तयार होणारे बायोचार लोदगा जि. लातुर येथे नापिक जमीनीवर बांबु पासुन निर्मित बायोचार चा वापर करुन जमीन सुपीक करण्याचा मह्त्वाकांक्षी प्रयोग सुरु होणार आहे.















