रत्नागिरी, (आरकेजी) : भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात आले.
रत्नागिरीतल्या शिवार- आंबेरे गावातील विजय लाखण यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास विहिरीवरचा पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या लाखण यांना विहिरीतून डरकाळी ऐकू आली, तेव्हा बिबट्या पडला असल्याचे समजले. वन विभागाला माहिती देण्यात आली. परिक्षेत्र वन अधिकारी बाबासाहेब पाटील तसेच लक्ष्मण गुरव, नानू गावडे, आर. बी. गुंटे, परमेश्वर डोईफोडे आदी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र विहिरीतील मातीच्या घबीत बिबट्या जाऊन बसल्याने त्याला बाहेर काढणे अवघड बनले. दिवसभर बिबट्याने हुलकावणी दिली. पिंजऱ्यात शिरण्यास बिबट्या तयार नव्हता. चौदा तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.