रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत. मंगळवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वृृध्दावर केेला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असूूून रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजापूर तालुक्यातील ओणी दैतवाडी येथे घटना घडली. धोंडू दैत असे या वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, मागील दोन महिन्यात बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याची ही पाचवी घटना आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, धोंडू दैत यांच्या पडवीत कुत्रा भुंकत होता. यामुळे त्याला हाकण्यासाठी दैत घराबाहेर आले. यावेळी बिबट्याने घरात प्रवेश करत घरात बांधलेल्या वासरावर हल्ला केला. अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे ते घाबरले व त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. याचवेळी दैत यांच्यावरही बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी ओणी येथील तालुका रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना रत्नागिरीत हलविण्यास सांगितले. सध्या त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शेजाऱ्यांनी बिबट्याला पिटाळून लावल्याने ते बचावले. मात्र बिबट्याचा लोकवस्तीत वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. यामुळे वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.