रत्नागिरी, (आरकेजी) : फासकीत अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करून त्याची सुटका करण्यात वनविभागाला यश आले. संगमेश्वर तालुक्यातल्या साखरपा गावात तब्बल तीन तास थरार घडला. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थानी सुटकेचा निश्वास टाकला आहे. रात्री चांदोली अभयारण्याच्या परिसरात या बिबट्याला मुक्त करण्यात आले.
चार महिन्यांपासून साखरपा परिसरात बिबट्याने दहशत माजवली होती. शेतकऱ्यांच्या गाई, बैल यांच्यावर हल्ले केले होते. तसेच अनेक कुत्री, मांजरं फस्त केली होती. त्यामुळे लोकांमध्ये भितींचे वातावरण होते. या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत होती.
आज रविवार दुपारी गुरांसह रानात गेलेल्या गुराख्याना बिबट्याच्या डरकाळ्या ऐकु आल्या. तो एकाच ठिकाणी असल्याचे दिसताच तो फासकीत अडकल्याचे समजले. वनविभागाला समजताच अधिकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. फासकीत अडकलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करणे जिकरीचे काम होते. वनविभाग कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने हे काम करत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं.