रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील मिठगावणे येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्यात आज चक्क बिबट्या शिरला. मात्र गोठ्यात शिरलेला हा बिबट्या जखमी अवस्थेत होता, त्यामुळे त्याचा गोठ्यातच मृत्यू झाला.
रामाचंद्र जौतापकर यांचा राजापूर तालुक्यातील मिठगावणे येथे गुरांचा गोठा आहे. या गोठ्यात आज दुपारच्या सुमारास जखमी अवस्थेतील एक बिबट्या शिरला. या बिबट्याच्या पुढच्या पायाला जखम झाली होती. बिबट्या गोठ्यात शिरल्यावर येथे बांधलेली गुरे ओरडू लागली, गुरं का ओरडत आहेत म्हणून बघण्यासाठी रामचंद्र जैतापकर गोठ्याजवळ गेले. त्याचवेळी त्यांना गोठ्यात बिबट्या बसलेला दिसला. त्यानंतर जैतापकर यांनी आरडाओरडा केल्यावर गावकरी जमा झाले. त्यांनी तातडीने वनविभागाला पाचारण केलं आणि बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. याचदरम्यान गुरांच्या गळ्यातील दोर कापून त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र बिबट्या काहीच हालचाल करत नव्हता. त्याला काठीने हलविण्यात आले, मात्र तरीसुद्धा तो काहीच प्रतिसाद देत नव्हता.. अखेर वनाधिकारी आणि ग्रामस्थानी त्याच्या पुढ्यात जाऊन पाहिले असता, बिबट्याने प्राण सोडलेले होते. त्याच्या पुढच्या पायाला जखम होऊन, त्याला गँगरीन झालं असल्याचं वनाधिकार्यानी सांगितलं. आणि त्यामुळेच शेवटच्या घटका मोजत असताना गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने काही वेळातच प्राण सोडले. रात्री आठच्या सुमारास या बिबट्याला ताब्यात घेण्यात आलं. उद्या या बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे.