रत्नागिरी (प्रतिनिधी): घरात घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५७ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाला. संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गौळवाडी येथे शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध इसमावर रत्नागिरीतल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावं हि दुर्गम भागात वसलेली आहे. या दुर्गम भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर वाढलेला आहे. तांबेडी गावातील गौळवाडी ही सुद्धा दुर्गम भागात वसली आहे. या वाडीत बिबट्याच्या संचार गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास बिबट्या गावात आला. यावेळी गोविंद कांबळे यांच्या घरातील कुत्र्यांवर बिबट्याने झडप घातली. मात्र त्याचवेळी दरवाजा उघडला गेल्याने कुत्रा घरात पळाला. मागावर आलेला बिबट्या ही घरात घुसला. अचानक घडलेल्या घटनेने कांबळे कुटुंबिय जागे झाले. पण समोरचा प्रकार पाहून सर्वांचीच बोबडी वळली, कारण साक्षात बिबट्या समोर उभा होता. याचवेळी गोविंद कांबळे यांच्या बाजुला उभ्या असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने पुन्हा झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्रा पळून गेला आणि गोविंद कांबळे बिबट्याच्या तावडीत सापडले. याचवेळी कुटुंबातील अन्य सदस्यांनी बिबट्याला पळवण्यासाठी त्याच्यावर काठीने हल्ला केला. मात्र तरीही बिबट्या गोविंद यांना सोडत नसल्याचे पाहून सर्वांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. दरम्यानच्या काळात सुमारे पाच मिनीटे गोविंद आणि बिबट्याची झुंज सुरू होती. दरम्यान पुन्हा कुटुंबियांनी बिबट्यावर हल्ला केल्याने बिथरलेल्या बिबट्याने अखेर घरातून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोविंद यांना तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या गोविंद यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गेल्या चार महिन्यात बिबट्याने माणसांवर हल्ला करण्याची संगमेश्वर तालुक्यातील ही चौथी घटना आहे. यामुळे ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत.