रत्नागिरी : रस्त्याच्या भुमिपूजना वरून रत्नागिरी येथील खेडमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आमने सामने आले. चिंचघर – तिसे रस्त्याच्या भुमिपूजना वरून हा वाद उफाळून आला.शिवसेनेने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज या रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना या कार्यक्रमासाठी डावलण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. त्यामुळे यावेळी सेना राष्ट्रवादीची जुंपली. या वादातून आदित्य ठाकरे आणि आमदार संजय कदम आमने सामने आले. आदित्य ठाकरे पोहोचायच्या आधीच आमदार संजय कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भूमीपूजनासाठी उभारलेल्या मंडपाला राष्ट्रवादीचे झेंडे लावले आणि आदित्य ठाकरे यायच्या आधीच त्यांनी भूमिपूजन केले.यानंतर इथे सेनेची लोक जमा हाऊ लागली आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते पुन्हा भूमीपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. या भूमिपूजन सोहळ्याला मोठा पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.