खेड: तालुक्यातील आंबवली येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाचे शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या हस्ते शनिवार (१०) रोजी भूमिपूजन करण्यात आले. या लघु प्रकल्पामुळे आठ-दहा गावांचा कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून दोनशे एकरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे. या मातीच्या धरणामुळे एकूण पाणीसाठा १५५० सहस्र घन मीटर होणार असून २.५९चौ.किमी पाणलोटाखाली येणार आहे. आंबवली येथे धरण व्हावे अशी मागणी १९९६ पासून केली जात होती. मात्र दोन वर्षांपूर्वी आमदार योगेश कदम यांनी आंबवली येथील जाहीर कार्यक्रमात हे धरण बांधण्याचे आश्वासन देत त्याची यावर्षी भूमिपूजन करून पूर्तता केली आहे. येत्या दोन वर्षात हे धरण पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आंबवली लघु पाटबंधारे प्रकल्पावर ४३ कोटी ९८ लाख ५३ हजार १४८ रुपयांचा निधी उपलब्ध केला असून या धरण क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना शासनाकडून मोबदला मिळवून देणार असल्याचे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिले.
ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधाण्यासाठी युवकांनी व्यावसायिक शेती व शेती पूरक व्यवसाय सुरू करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अंबावली येथे उभ्या राहत असेलल्या छोट्या जल सिंचन प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना बारमाही शेती आणि भाजीपाला उत्पादन घेण्याची गरज आहे यामधून या भागातील आर्थिक विकास होण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे आंबवली परिसरातील वरवली, देवघर, हुंबरी म्हाळुंगे, मोहाने या गावांना कृषी सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.
या प्रकल्पामुळे सुमारे दोनशे एकरांपेक्षा जास्त शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. या धरणाच्या उभारणीसाठी ४४ कोटी रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. या कार्यक्रमाला तालुका प्रमुख सचिन धाडवे, महेंद्र भोसले, रामचंद्र आईनकर, सुप्रिया पवार, नाना कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष स तू कदम यांच्या सह शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.