रत्नागिरी, (आरकेजी) : ओव्हरटेक करणाऱ्या मारुती डिझायर कारला वाचविण्याच्या प्रयत्नात देवदर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या खासगी आरामबसला मुंबई-गोवा माहामार्गावर भोस्ते घाटात अपघात झाला. चालक उपेंद्र कावजी याने आपले सारे कौशल्य पणाला लावून, सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळणारी बस नियंत्रीत केल्याने फार मोठा अनर्थ टळला.
पेण तालुक्यातील मळेघर येथील भाविक (एमएम ०४ जी ७२४२) या आनंद ट्रॅव्हल्सच्या खासगी आरामबसने ५ दिवसांच्या देवदर्शन यात्रेवर गेले होते. पनवेल मळेघर येथून निघालेली ही बस पंढरपूर, गाणगापूर, कोल्हापूर, गणपतीपुळे ही तिर्थक्षेत्रं करत बुधवारी परतीच्या प्रवाशाला निघाली होती. सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास ही बस भोस्ते घाट उतरत होती. देवदर्शन करुन घराकडे निघालेल्या भाविकांनी बसमध्ये भजनाचा ठेका धरला होता.
अचानक समोरुन ओव्हरटेक करत भरधाव येणारी मारुती डिझायर कारचालक उपेंद्र कावजी याला दिसली आणि त्याच्या ह्दयाचा ठोका चुकला. कारला वाचविण्यासाठी त्याने बस डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बस दरीच्या बाजुला असलेल्या कठड्यावर आदळली. काही क्षणासाठी नियंत्रण सुटलेली बस खोल दरीत कोसळणार हे लक्षात येताच चालक उपेंद्र कावजी यांने सारे कौशल्य पणाला लावत दरीत कोसळू पाहणारी बस नियंत्रीत केली आणि मोठा अनर्थ टळला. दुर्दैवाने बस नियंत्रीत झाली नसती तर भाविकांच्या परतीच्या प्रवासाची ती बस सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली असती.
या अपघाताला कारणीभुत ठरलेली मारुती डिझायर कार विशाल तुकाराम पाटील चालवत होता. तोही औरंगाबाद येथील दिपक अगरावत यांच्या कटुबियांना घेऊन पर्यटनासाठी निघाला होता. आज तो मुरुड-जंजीरा येथून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघाला होता. भोस्ते घाटात पुढील वाहनाला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांमधील कोणीही जखमी झाले नाही.
अपघाताची खबर मिळताच खेड येथील मदत ग्रुपचे सदस्य तसेच खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त आराम बस बाजूला केल्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खूला झाला.
अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले आहे.