रत्नागिरी,(आरकेजी) : शेतमालाला हमीभाव नसल्यास त्याचा गंभीर परिणाम शेतकर्याच्या आर्थिक उत्पन्नावर कसा होतो, याचे चित्र लांजा तालुक्यातील खेरवसे गावात पहायला मिळत आहे. पारंपरिक शेतीच्या ऐवजी शेतात भोपळ्याचे पीक घेऊन अभिनव प्रयोग राबविणार्या शेतकर्यांवर भविष्यात शेती नको, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
या गावात तीन मित्र एकत्र आले त्यांनी भोपळ्याचे उत्पन्न घेतले. कोकणातला हा पहिला प्रयोग यशस्वी झाला. पिकानेही साथ दिली. मात्र, अवघा दोन रुपये किलो असा दर या भोपळ्याला वाशी मार्केटमध्ये मिळत आहे. यामुळे भोपळा मार्केटला पाठवणे परवडत नसल्याने पावसात सुमारे २५ टनाहून जास्त भोपळा सडू लागला आहे.
खेरवसे गावातील प्रविण जेधे, मिलिंद माने आणि शरद चव्हाण हे तीन शेतकरी मित्र एकत्र आले आणि त्यांनी कोकणात पहिला भोपळा शेतीचा अभिनव प्रयोग राबवला. निसर्गाने साथ दिली आणि भोपळ्याचे भरघोस उत्पादन देखील आले. मागील दोन महिन्यात शेतीच्या मालाचे भाव गडगडले आहेत. त्याचा फटका भोपळा पिकाला सुद्धा बसला आहे. दिड ते तीन रुपये असा सध्या भोपळ्याचा किलोचा दर आहे. तो परवडत नसल्याचे खेरवसेच्या शेतात सध्या २५ टन भोपळा सडत आहे. दिड ते अडिच रुपये दरात वाशी मार्केटला भोपळा पाठवणे परवडणारे नसल्याने पिकवलेला भोपळा डोळ्यादेखत सडत पाहण्याची वेळ या शेतकरी मित्रांवर आली आहे.
” पडलेल्या पावसामुळे उत्पादन झालेले भोपळे कुजत आहेत. बँकेच्या कर्जाचा हप्ताही आहे. आता भविष्यात शेती करणे अवघड आहेम अशी भावना शरद चव्हाण यांनी व्यक्त केली.