मुंबई, (निसार अली) : खोटे आमिष दाखवून तीन कोटींची फसवणूक आणि बलात्कार केल्याप्रकरणी आप्पा महाराज या भोंदूबाबाविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात फौजदारी कलम १५४ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम २०१३ ही लावण्यात आला आहे. राष्ट्र्वादीचे नेते संदेश कोंडविलकर हे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही फिर्यादीने केला आहे. कोंडविलकर यांचे नावही पोलिसांनी नोंद केले आहे.
फिर्यादीला या बाबाने खोटे आमिष दाखवले तसेच त्याच्या मुलीवर बलात्कार केला. या गुन्ह्यात बाबाचा सहकारी अंकुश शेट्ये हा ही सहभागी आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. शेट्येही या प्रकरणात आरोपी आहे.
चारकोप पोलीस या प्रकरणी टाळाटाळ करत आहेत, असा आरोप बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीचे अध्यक्ष श्याम झळके यांनी केला. झळके यांनी चारकोप पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यानंतर पोलीस उपायुक्त यांनी दखल घेत गुन्हा नोंदवला आहे.