रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी तालुक्यातील भावेआडम गावातील गरिब कुटुंबाला मृत्यूचे भय दाखवत दागिने लंपास करणाऱ्या भोंदू बाबाला अटक करण्यात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना यश आले. भोंदूबाबा पोलीस कोठडीत असून दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अशिक्षितपणा आणि गरिबीचा फायदा घेत भावेआडम येथील तांबे कुटुंबाची मुश्ताक काजी या भोंदूबाबाने फसवणूक केली होती. मृत्यूचे भय दाखवून शुद्धीकरणाच्या नावावर मुस्ताकने लाखोंचे दागिने लंपास केले होते. १३ विविध प्रकारचे दागिने तुमच्या मरणाचा फास ठरणार आहेत, तेव्हा त्या दागिन्यांची शुद्धी करणे आवश्यक आहे, असे सांगत त्याने ते लाटले गेले.
वर्षभर त्याने दागिने स्वत:कडे ठेवले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर भोंदूबाबाविरोधात रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तक्रार दाखल झाल्यावर बाबा फरार झाला होता.
भोंदूबाबाने फसवणूक करून नेलेले दागिने प्रथम इंडिया इन्फोलाईन फायनान्सकडे गहाण ठेऊन पैसे घेतले. त्यानंतर दागिने सोडवून या काजीने हे दागिने एका ज्वेलर्समध्ये विकले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या ज्वेलर्सवाल्याकडून हे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान इंडिया इन्फोलाईन फायनान्समध्ये या भोंदूबाबाच्या नावे सोन्याचे तब्बल २६ व्यवहार आढळून आले आहेत. त्यामुळे या भोंदूबाबाकडून अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केले आहे.