रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- जादूटोणा कायद्याअंतर्गत अटक झालेल्या भोंदू बाबाला जामीन मिळावा यासाठी रत्नागिरी न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. मात्र यावर गुरुवारी (५ ऑक्टो) अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
२१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर हा कालावधी पोलीस कोठडीत काढल्यानंतर भोंदू पाटील बुवाची रवानगी १ ऑक्टोबरला न्यायालयीन कोठडीत झाली. त्यानंतर झरेवाडीतल्या या पाटील बुवाने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. माझे कुटुंब माझ्यावर अवलंबून असल्याने जामिन मिळावा असा युक्तिवाद भोंदू बाबाच्या वकिलांनी केला. बुधवारी त्याच्या जामीन अर्जावर रत्नागिरी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाच्या निकालावर सर्वांचे लक्ष्य लागले होते. मात्र त्याच्या जामीनाबाबतचा निकाल रत्नागिरी न्यायालयाने राखून ठेवत गुरुवारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उद्या त्याला जामीन मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.