रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरीतल्या झरेवाडीतील भोंदू पाटील बुवाची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुटका केली. यापूर्वीच न्यायालयाने प्रशांत पारकर, अनिल मयेकर आणि संदेश पेडणेकर या पाटील बुवाच्या तीन साथिदारांची जामिनावर मुक्तता केली होती. दरम्यान, अटक केल्यापासून १०० दिवसानंतर पाटीलबुवाची सुटका झाली आहे.
पाटील बुवाला जामिन देताना न्यायालयाने त्याने झरेवाडीमध्ये प्रवेश करायचा नाही. धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे आणि वस्तू गोळा करायच्या नाहीत. सरकारी पक्षाच्या साक्षिदारांवर दबाव आणायचा नाही. तसेच खटल्याच्या प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर रहायचे अन्यथा जामिन रद्द करण्यात येईल या शर्थींवर जामिन मंजूर केला आहे. काही महिन्यांपूर्वी झरेवाडीतील पाटील बुवाचे कारनामे उघड करणारा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. मठात येणाऱ्या महिलांना अश्लिल शिवीगाळ करताना आजारी भक्तांना डॉक्टरकडे जाण्यास मज्जाव करताना पाटील बुवा या व्हिडीयोत कैद झाला होता. पाटील बुवाने नागरिकांना आपण दैवी अवतार असून माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी चमत्कार करु शकतो. मेलेले मूल जिवंत करतो. असे सांगून लोकांना भिती दाखवून त्यांची आर्थिक लूट केली होती. तसेच त्याच्या मठात येणाऱ्या महिलेला त्याने अश्लिल शिवीगाळ केली होती. त्याप्रकरणी तिने ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. या व्हिडीओनंतर पाटील बुवा विरोधात संतापाची लाट उसळली होती. ग्रामीण पोलीस स्थानकात एका महिलेने तक्रार नोंदवली आणि पाटील बुवाला २१ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती.
न्यायालयात हजर केल्यावर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पाटील बुवाला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता पाटील बुवाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाटील बुवाने जामिन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतू त्याने केलेल्या गुन्हयाची गंभिरता लक्षात घेउन न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज वेळोवेळी फेटाळला होता. अखेर शुक्रवार २९ डिसेंबर रोजी न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा सशर्त जामिन मंजूर केला.