भिवंडी, पनवेल, मालेगाव : भिवंडी निजामपूर, पनवेल, मालेगाव या महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत भिवंडीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आले. पनवेल महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक झाली. पहिल्या पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला. शेतकरी कामगार पक्षासारख्या जुन्या आणि पुरोगामी पक्षाला भाजपाने धूळ चारली. मालेगावमध्ये त्रिशंकू अवस्था असली तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी दुसर्या स्थानावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात येथे कोणाची सत्ता येते हे स्पष्ट होईल.
भिवंडी
कॉग्रेसने येथे जोरदार मुसंडी मारत ४७ जागांवर विजय मिळवला आहे. या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मतदारांनी शिवसेनेसह समाजवादी पक्षाला जोरदार झटका दिला. कोणार्क विकास आघाडीला अवघ्या ४ जागा मिळाल्या आहेत. भाजपला १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. ९० जागांसाठी मतदान झाले. ४६० उमेदवार रिंगणात उभे होते. शिवसेना या निवडणुकीत पिछाडीवर गेली आहे.
काँग्रेस -४७, भाजप – १९,शिवसेना – १२ ,रिपाई – ४,सपा – २
————————————————————————————————————————————-
पनवेल
भाजपाने शेतकरी कामगार पक्षाची या निवडणुकीत धूळधाण करून टाकली. एकूण ७८ पैकी ५१ जागांवर भाजपाने विजय मिळवला. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीला फक्त २७ जागा मिळाल्या. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भोपळाही फोडता आलेला नाही.
भाजपा – ५१,शेकाप-२३, काँग्रेस -२, राष्ट्रवादी काँग्रेस -२
मालेगाव
मालेगाव महापालिकेत ८४ जागांचे निकाल लागले. काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला २० जागा मिळाल्या. महापौर बनण्यासाठी ४३ हा जादुई आकडा आहे. आता कोणता पक्ष बहुमत गाठतो, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरा महाज यांनी आघाडी केली होती.
काँग्रेस-२८, राष्ट्रवादी- २०, शिवसेना- १३, भाजपा- ९, एमआयएम -७, जनता दल- ६, अपक्ष-१