रत्नागिरी : भीमा कोरेगांव प्रकरण, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थी शिष्यवृत्ती, शेतकऱयांचा कोरा सातबारा करणे, खेड-चिपळूण येथील पुतळा विटंबना, भीमस्तंभ तोडफोड प्रकरण आदी प्रश्नांबाबत भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं.या महासंघाच्या म्हणण्यानुसार भीमा कोरेगांव पकरण घडल्याकामी जबाबदार असलेल्या मुख्य सूत्रधार मनोहर कुलकर्णी उर्प संभाजी भिडे यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारिप बहुजन महासंघातर्फे तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यांना तात्काळ अटक करावी अशी प्रमुख मागणी आहे. या हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. हे दाखल सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशीही मागणी केली जात आहे. त्याचबरोबर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी. टीआयएसएस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात. शेतकऱयांचा सातबारा कोरा करण्यात यावा अशाही मागण्या शासनाकडे केल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना समाजकंटकांनी केली होती. तसेच या घटनेच्या पाठोपाठ चिपळूण येथील कळंबस्ते गावात भीमस्तंभाची तोडफोड करण्यात आली. अशापकारे समाजविघातक कृत्ये करणाऱया माथेफिरू धर्मकंटक आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या घंटानाद निदर्शनावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांताराम कदम, उपाध्यक्ष सिध्दार्थ सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.