मुंबई : भीमा कोरेगाव येथे निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (३जाने) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातील सर्व संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत केले. यावेळी आज राज्यभरात कार्यकर्त्यांनी पुकारलेला बंद मागे घ्यावा, अशी सूचना केली. दरम्यान आज अनेक ठिकाणी घटनेचे पडसाद उमटल्याने मुंबईसह राज्यात दुपारनंतर कडकडीत बंद पाळण्यात आला.
भीमा कोरेगावमध्ये आंबेडकरी अनुयायांना आज लक्ष्य करण्यात आले. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या घटनेचे सूत्रधार आहेत. मात्र राज्यात उसळलेल्या हिंसाचाराकडे पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातही दुपारी दोन वाजेपर्यंत हिंसाचारबाबत माहिती मिळालेली नव्हती. शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडी यांनी हा हिंसाचार घडवून आणला आहे, असाही आरोप आंबेडकर यांनी करत हिंसाचार पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांना कोरेगाव ते शिरुर आणि कोरेगाव ते चाकण या पट्ट्यातील गावांनी मदत केल्याचा आरोपही त्यांनी केली. तसेच या गावांचे अनुदान पुढील दोन वर्षांसाठी बंद करावे, अशी मागणी आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे परिषदेत सांगितले.
मुंबईत आज वेगवेगळया भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा जोर वाढल्यानंतर मुंबईत शाळा, कॉलेजेना सुट्टी देण्यात आली. आंदोलक थेट रस्त्यावर उतरल्याने काही भागात वाहतूक कोंडी झाली. चेंबूर, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक रोखून धरली. चेंबूर दरम्यान रेल रोको करण्यात आल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी मार्गावरील स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. काही ठिकाणी बेस्ट बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.