मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम अर्थशास्त्री होते. त्यांनी समतेच्या तत्त्वावर संविधानाची निर्मिती केली आहे. २० व्या शतकातील चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र होते. आता २१ व्या शतकातील डिजीटल चलनावर ‘भीम ॲप’ व ‘भीम आधार ॲप’ला राष्ट्रनिर्माते असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले आहे. हीच डॉ. आंबेडकर यांना मोठी मानवंदना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अनुसूचित जाती,जमाती,विजा-भजा,इमाव,विमाप्र शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शनिवारी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे, आयकर विभागाचे आयुक्त सुबचन राम, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यास छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकविले. स्वराज्याच्या स्थापनेसाठी सामान्य लोकांना एकत्रित करुन त्यांच्यात पौरुष जागृत करून मोठी सेना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली. आमचा राजा समाजासाठी लढत असल्याची भावना त्यांच्या सैन्यात असल्यामुळे मोठमोठ्या सैन्याबरोबर त्यांनी लढाई केली. समाजात विषमता तयार झाली. त्यावेळी मानव मानवाला कमी लेखत होता. या विषमतेत जगत असतानाच प्रचंड संघर्ष करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समतेचे, न्यायाचे, घटनेचे संविधान दिले. डॉ. आंबेडकर यांचे इतिहासात बहुमोल कार्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम विधीज्ञ तसेच उत्तम अर्थशास्त्री होते. त्यांनी त्या काळात अर्थशास्त्रावर केलेले संशोधन आजही जगात अत्यंत मोलाचे मानले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘भीम ॲप’ आणि ‘भीम आधार ॲप’ तयार केले. महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, शेतकऱ्यांबद्दलचे त्यांचे विचार ही मोलाचे आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागण्यांसंदर्भात बैठक घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. पाच दिवसाच्या आठवड्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर योग्य निर्णय घेऊ. मंत्रालयातील प्रवेशद्वारांना राष्ट्र पुरुषांचे नाव देण्यासंदर्भातील संघटनेच्या मागणी व्यवहार्य असून त्यासाठी राज्यव्यापी धोरण ठरवून निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आठवले म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारकासाठी ३६०० कोटी किंमतीची जमीन दिली. तसेच स्मारकासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. लंडन येथील डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या घराची खरेदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीत उभी राहत असलेली भव्य इमारत, भीम ॲप व भीम आधार ॲप आदी महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले आहेत.
बडोले म्हणाले की, आज जग छोटे होत असून ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरणार आहेत. विषमता दूर करण्यासाठी महापुरुषांचे तत्त्वज्ञान मनामनात रुजण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी प्रास्ताविक केले.