मराठीत या वर्षातील सर्वात बहुचर्चित सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भिकारी’ सिनेमाची सध्या मोठी हवा आहे. मी मराठा फिल्म प्रॉडक्शन शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन प्रस्तूत या सिनेमातील गाण्यांची देखील तेव्हढीच चर्चा आहे. श्रीमंती आणि गरिबी असे समाजातील दोन टोक मांडणारा हा सिनेमा बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मास्तर गणेश आचार्य यांनी दिग्दर्शित केला आहे. आपल्या लाडक्या मास्तरजींच्या या ‘भिकारी’ सिनेमाचे संपूर्ण बॉलिवूडकरांनी आणि मराठी कलाकारांनी तोंड भरून कौतुकदेखील केले आहे. अंधेरी येथे नुकत्याच झालेल्या ‘भिकारी’ सिनेमाच्या सॉंग लॉंच कार्यक्रमात याची पुन्हा प्रचिती आली. रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे या स्टार्सनी उपस्थिती लावत सॉंग लॉंच कार्यक्रमात रंग भरला. शिवाय ‘भिकारी’ सिनेमातील गाण्यांचे त्यांनी तोंडभरून कौतुक देखील केले. या कार्यक्रमात ‘काशा’ आणि ‘बाळा’या गाण्यांचे सादरीकरणदेखील करण्यात आले.
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असणाऱ्या या सिनेमातील ‘काशा’ हे गाणे अवधूत गुप्ते, आनंद शिंदे यांनी गायले असून गणेश आचार्य यांचा आवाजदेखील आपल्याला या गाण्यात ऐकता येणार आहे. या गाण्याला मिलिंद वानखेडे यांनी ताल दिला असून, हे गाणे प्रेक्षकांना ठेका धरण्यास भाग पाडत आहे. ‘भिकारी’ सिनेमातील महत्वाचे वळण या गाण्यात दिसत आहे. भिकारी लोकांचे आयुष्य आणि त्यांची दिनचर्या मांडणाऱ्या या गाण्याचे सुबोध पवार आणि गणेश आचार्य यांनी लिहिले आहेत. शिवाय ‘बाळा’ हे हे गाणेदेखील चांगले जमले असून, लंडनच्या रस्त्यावर मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी, चक्क हिपहॉप करताना आपल्याला यात पाहायला मिळतो. हिंदीचे प्रचलित संगीत दिग्दर्शक विशाल मिश्रा यांचा आवाज आणि ताल या गाण्याला लाभला असल्याकारणामुळे,हे गाणे ‘भिकारी’ सिनेमाच्या दर्जेदार निर्मितीचा पुरावा देते. सिनेमाच्या सुरुवातीला स्वप्नीलचा परिचय करून देणारे हे गाणेदेखील लोकांना भरपूर आवडत आहे. भिकारी सिनेमातील या दोन गाण्यांचे वैशिष्टय म्हणजे, समाजातील दोन स्तरांमध्ये दिसणारा पराकोटीचा फरक या गाण्यांमधून आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे ‘देवा हो देवा’, ‘मागू कसा’ आणि ‘ये आता’ ह्या गाण्यांनादेखील सिनेरसिकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळतो.
श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा आहे. महेश लिमये यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाची कथा ससी यांची असून पटकथा, संवाद गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. येत्या ४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात स्वप्नील जोशीसोबतच ऋचा इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.