बहुचर्चित ‘स्वामी तिन्ही जगाचा…भिकारी’ ह्या आगामी मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सिद्धिविनायक मंदिरात एका नव्या पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. हिंदीचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य दिग्दर्शित हा सिनेमा ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. गणपतीचे छायचित्र असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने सोशल नेट्र्वर्किंग साईटवर अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. विशेष म्हणजे टायगर श्रॉफ, वरून धवन आणि जॅकलीन फर्नाडिस यासारख्या बी-टाऊनच्या सुपरस्टार्सनी या पोस्टरची दखल आपल्या ट्विटरद्वारे घेतली असून मास्टर गणेश आचार्य यांना सिनेमाबाबत शुभेच्छादेखील दिल्या. यापूर्वी रणवीर सिंगनेदेखील आपल्या ट्वीटरद्वारे ‘भिकारी’ सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण केले होते. तसेच मराठीतील नामवंत कलाकारांकडूनदेखील या पोस्टरला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
हिंदीचे सुप्रसिद्ध कॉरीयोग्राफर गणेश आचार्य दिग्दर्शित ‘भिकारी’ सिनेमाचा हा नवा पोस्टर, अनेक गोष्टींचा खुलासा करतो. यापूर्वी छत्रीच्या आत दडलेल्या पहिल्या पोस्टरमधील व्यक्ती, मराठीचा हँडसम हंक अभिनेता स्वप्नील जोशी असल्याचे या पोस्टरद्वारे दिसून येते. एका श्रीमंत घराण्यातील युवक रस्त्यावर दयनीय अवस्थेत झोपला असल्याचे पोस्टरवर पाहायला मिळते, आपल्याकडील सारे काही हिरावून घेणाऱ्या नियतीपुढे हतबल झालेल्या तरुणाची केविलवाणी अवस्था यात दिसत असून, त्याने रेखाटलेले गणपतीचे चित्रदेखील पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. या चित्रावर लोकांनी टाकलेले पैसेदेखील यात पाहायला मिळत असल्यामुळे, हा पोस्टर आयुष्यातील एका बिकट परिस्थितीचा मर्म शिकवून जातो.
आतापर्यंत चॉकलेट बॉयच्या भूमिकेत दिसणा-या स्वप्नीलचा हा नवा अंदाज त्याच्या चाहत्यांना नक्कीच संभ्रमात टाकणारा आहे. मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य यांची निर्मिती असलेला हा पहिला सिनेमा असून, मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार सिनेमाच्या यादीत ‘भिकारी’ सिनेमाचा समवेश होण्याची दाट शक्यतादेखील वर्तवली जात आहे.