
(ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड अजित अभ्यंकर यांच्या फेसबुकवर वॉलवरून साभार)
कोणत्याही शोषणाविरोधातील किंवा अन्यायाविरोधातील चळवळीची सुरवात प्रस्थापित व्यवस्थेला नकार किंवा आव्हान देण्यातून होते. ते योग्य आणि आवश्यकच असते. परंतु, या नकाराचे रूपांतर नव्या सामाजिक संबंधांच्या पुरस्कारात व्हावे लागते. कारण नकारातून दिसते तीव्र भावना, स्फोटक शक्ती. पण जर स्फोटामागोमाग नव्या समाजाच्या निर्मितीचा-त्याच्या मूल्यांचा प्रतिभाशाली आविष्कार नसेल, तर तो नकार निष्फल होण्यास वेळ लागत नाही. हा जगातील सर्व सामाजिक-राजकीय चळवळींचा अनुभव आहे.
प्रस्थापिताला नकाराचे आणि नव्या व्यवस्थेच्या पुरस्काराचे जैव एकत्व ज्यांच्यामध्ये दिसून आले, त्या थोर नेते आणि कलावंतांमध्ये समावेश होतो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा.
कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिभा शोषितांच्या मुक्तीसंघर्षात फुलली. तिचे अंकुर त्याच मातीमधूनच वर आलेले होते. म्हणूनच तिच्यामध्ये सच्चेपणा आहे.पण त्याचवेळी त्यांच्या सर्व साहित्यामध्ये भेटणारी माणसे ही अत्यंत कठीण परिस्थितीतदेखील आपले मनुष्यत्व जोपासणारीच दिसतात. नकारात्मकता किंवा केवळ दुःखाचे वर्णन असे त्यांच्या साहित्याचे स्वरूप नाही ;त्याचे कारण त्यांची नाळ लाल बावट्याच्या परिवर्तनवादी चळवळीशी अपरिहार्यपणे जोडली गेलेली होती. शोषणमुक्त समाजाची स्थापना हेच त्यांचे ध्येय होते.त्यासाठीच ते जगले. आज आपण त्याची स्मृती जागवत आहोत, ती या भविष्यवेधी आणि व्यापक अशा शोषितांच्या मुक्तिची प्रेरणा त्यातून आपल्याला मिळते म्हणूनच ; केवळ मूर्तिपूजा म्हणून नव्हे.
ते पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. पण त्यांची दलित शब्दाची व्याख्या दलित याचा अर्थ जातीविशिष्ट अशी नव्हे, तर सर्वच शोषित असा करण्याइतकी व्यापक होती. आज ही संकल्पना पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. शोषितांच्या चळवळीमध्ये कोण कोणत्या जातीमध्ये जन्माला आला, यावरून त्याची निष्ठा आणि बांधिलकी ठऱविणाऱ्यांची फूटपाडी भूमिका नाकारून अण्णाभाऊंच्या विचारांच्या-मूल्यांच्या मार्गाने गेले पाहिजे.
अण्णाभाऊंनी महाराष्ट्रातील लोकांमधील नाट्य नृत्य संगीताचा बाज अनुभवला होता. त्यांनी आपल्या वगांची, लोकनाट्यांची ,कवनांची रचना करताना त्या संगीताचा, सादरीकरणाचा बाज कायम ठेवला. पण देव धर्म किंवा केवळ नाच गाणी हा त्याचा आशय बदलला. लोकांची करमणूक करतानाच त्यांना विचार करायला लावेल, त्यांना परिस्थितीचे भान देत, सामाजिक-राजकीय चळवळीची मूल्ये त्यांच्या मनावर बिंबतील अशी कथानके आणि गाणी-पोवाडे लिहले.
त्यांनी तमाशातील गणाची आणि गणपती इत्यादी देवादिकांच्या पूजेने कार्यक्रम सुरू करण्याची परंपरा त्यांनी मोडली. त्याच्या जागी त्यांनी सुरू केली, जगाच्या संस्कृतीचा निर्मिता असणाऱ्या श्रमिकाच्या तळहाताची पूजा करण्याची परंपरा सुरू केली. त्यांनी त्यांच्या कवनामध्ये या श्रमिकाच्या तळहाताबद्दल म्हणले आहे,
प्रारंभी मी आजला, कर ज्याचा येथे पूजिला।
जो व्यापूनि संसाराला, हलवि या भूगोला ।।
रूद्ररूपी ज्याची शक्ती, मानवाची करी जो भक्ती ।
जो उठवूनिया संसारा, जो शापित उन्मत्ताला।।
शाहीर अमर शेख, द. ना. गवाणकर आणि वा. वि. भट यांच्या सारख्या सहकाऱ्यांबरोबर ते लाल बावटा कलापथकाचे घटक राहिले.त्यांच्या साहित्यामध्ये एका बाजूला शोषणाची सखोल संवेदना दिसते तशीच समाजवादी समाज निर्माण करण्याची तीव्र बांधिलकी, चळवळीची पोहोच आणि सखोल समज दिसून येते. त्यांनी 1940 -50 मध्ये अत्यंत कडवेपणाने ह्या पथकामार्फत श्रमिकांच्या चळवळीत चेतना निर्माण केली. तर 1955 नंतर 1960 पर्यंत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये उभा मराठी देश जागा केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचा सहभाग हा केवळ एक शाहिर म्हणून नव्हता. तर राज्यकारभार हा लोकांच्या भाषेत, लोकांना आपले वाटेल अशा सरकारच्या माध्यमातूनच चालला पाहिजे, अशी सखोल लोकशाही जाणीव त्यामागे होती. कारण ते यासाठी कटिबद्ध असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचे घटक होते. हा लाल बावटा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा खरा नायक होता.
कारण हा बावटा प्रतिनिधित्व करत होता महाराष्ट्रातील कामगार शेतकऱ्यांचे. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक केवळ प्रशासकीय घटना नव्हती. त्यात १०५ कार्यकर्त्यांनी प्राणार्पण केले. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड मिरजकर, साथी एस्. एम्. जोशी, क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, लालजी पेंडसे, या सारखे दिग्गज नेते हे कामगार-शेतकरीवर्गाची ध्वजा हातात घेतलेले नेते होते. याराजकीय नेत्यांच्या सोबत आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे यांच्या सारखे साहित्यिक आणि कलावंतदेखील या चळवळीत होते. त्यांच्या लेखनातून , काव्यातून हीच लोकशाही जाणीव व्यक्त होत होती. त्यामध्ये कधीच अन्य भाषिकांबद्दल द्वेष, सूड इत्यादी कोणत्याही भावना कधीच दिसली नाही. कारण भाषिक राज्याची मागणी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशालाच लागू होत होती. देशाची घटना, भावनिक आणि राष्ट्रीय एकात्मता या साऱ्यांच्या आधीन राहूनच हे आंदोलन उभे राहिले होते. लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि कॉम्रेड अमर शेख मराठी माती त्यासाठी जागी केली.
कारण मुळात संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा हा एक वर्गसंघर्षच होता. त्याचे कारण मुंबई. मुंबईचा महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यास भांडवलदार वर्गाचाच फक्त विरोध होता.मुंबई ही भांडवलाचे केंद्र होती. भांडवलाच्या मालकांना तिचे नियंत्रण स्वतःकडेच हवे होते. मराठी भाषिक राज्यातील मुंबईमध्य़े सरकारवर भांडवलदारांपेक्षा कामगार-शेतकऱ्य़ांचा, समाजवादी विचाराचाच जास्त प्रभाव राहील, हे त्यांना समजत होते.
तर कामगार शेतकऱ्यांना वाटत होते की, मुंबईत भांडवलवाले जर अमराठी असले, तरी त्यांचे उद्योग ज्यांच्या श्रमातून उभे राहिले आहेत, त्या श्रमजीवींचा लोकशाही अधिकार या मुंबईवर आहे. आणि तो भारतीय घटनेला अनुसरूनच आहे. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत आहे. भांडवलदार वर्गाला लोकशाही राज्य त्यांना सोईचे असते, तितपतच मान्य होते. म्हणून मुंबईवरूनच खरा संघर्ष निर्माण झाला होता.
एका बाजूला भूतकाळातून आलेल्या जातवास्तवाचा, जातिव्यवस्थेचा अनुभव पचवायचा ; त्याचे केवळ वर्णन करत, ती दुःखे चघळत थांबायचे नाही, तर त्याचेच खत करून उद्याच्या समतेवर आधारित समाजवादी समाजाचे रोपटे रसरशीतपणे वाढविण्यासाठी त्याचा वापर करायचा.
थोडक्यात गतकाळाचे भूत म्हणून राजकारण करण्यापेक्षा, भविष्याचे दूत म्हणून कार्य करायचे. अशा चळवळीत स्वतःला झोकून द्यायचे.
हाच होता,अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा,लेखनाचा, काव्याचा स्वप्नांचा सारांश!!















