रत्नागिरी : भाट्ये येथील समुद्रकिनारी शुक्रवारी पहाटे भरतीच्यावेळी वाहून आलेली मृतावस्थेतील तीन ऑलिव्ह रिडले जातीची कासवे सापडली. या कासवांचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. वनविभाग व भाट्ये ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांनी ही मृतावस्थेतील कासवे वाळूमध्ये पुरुन टाकली.
भाट्ये समुद्रकिनारी मॉनिर्ंग वॉकसाठी येणार्या शहरवासीयांना मृतावस्थेतील तीन कासवे दिसून आली. यात भाट्ये येथील वॉचिंग टॉवरच्या समोर एक सुमारे दोन फुटाचे कासव मृतावस्थेत पडले होते. या कासवाचे तोंड व डोके कुत्र्यांनी ओरबडल्याने त्याचा पुढील भाग नष्ट झाला होता. दुसरे कासव रत्नसागर रिसॉर्टच्या समोर किनार्यावर पडलेले होते. या कासवाच्या कवचाकडील अर्धाभाग, पोट फाडलेले होते तर तिसरे कासव सुमारे शंभर मीटरवर वाळूमध्ये उलटे रुतलेले होते.
तीन कासवांचा मृत्यू कधी झाला व कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नव्हते. कासवांचा विणीछाप हंगाम असल्याने ही मोठी कासवे अंडी घालण्यासाठी किनार्यावर येतात. या प्रवासात किनार्यावर होणार्या मासेमारी करणार्यांच्या जाळ्यात सापडून या कासवांचा मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणाने हे स्पष्ट झाले नाही. कासवांचा मृत्यू होऊन दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला होता.
याची माहिती काही जागरुक नागरिकांनी वनविभागाला दिल्यानंतर, वनविभागाचे कर्मचारी भाट्ये किनारी दाखल झाले. याठिकाणी त्यांनी कासवांची पाहणी केली व त्यांची अवस्था बघून वाळूमध्ये पुरण्याचा निर्णय घेतला. एकाचवेळी तीन मोठ्या कासवांचा मृत्यू झाल्याने वन्यप्राणीप्रेमींनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. सध्या कासवांना वाचवण्याच्या दृष्टीने अनेक गावांमध्ये पुढाकार घेतला जात आहे. अशा परिस्थितीत या कासवांचा मृत्यू विचार करायला लावणारा आहे.