घाटकोपर : भटवाडीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मंगळवार दिनांक ३१ रोजी या मंडळाच्या गणेशमूर्तीच्या पाद्यपूजन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. अंगारकी संकष्टीच्या दिवशीच हा सोहळा पार पडल्याने या पाद्यपूजन सोहळ्याला भटवाडी मधील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. गणेशोत्सवाचे यंदा ५० वे वर्ष आहे. गेली ४९ वर्ष मंडळातफे विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. भविष्यामध्ये असे आणखी विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. गेल्या ४९ वर्षात मडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यालयामध्ये स्वामी शामानंद या मराठी माध्यमाचे दिवस व रात्रशाळेचे वर्ग भरतात. विभागातील होतकरु मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील क्रिडा प्रेम जागृत ठेवण्यासाठी व विविध कार्यक्रम राबविण्यासाठी मंदिराशेजारील मैदान राखून ठेवण्यात आले आहे, विविध समाजपयोगी कामे संस्था करत आहे.या वर्षी अध्यक्ष मंगेश परब यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णमहोत्सवी उत्सव पार पडत आहे. मंडळाच्या गणेशोत्सवाची सुरुवात प्रत्येकी दोन रुपये वर्गणीने सुरु झाली होती. आजघडीला गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांची तिसरी पिढी हा उत्सव साजरा करण्यास सज्ज झाली आहे. या वर्षी देखील रेखीव गणेशमूर्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनपट आणि त्यांचे चरित्र चलचित्रातून मांडण्यात येणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या पाद्यपूजन सोहळ्यापासून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून दिवसेंदिवस या तयारीला अजून रंग चढणार असल्याने आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.