मुंबई : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या मंत्रालयातील नुतनीकृत कार्यालय आणि ग्रंथालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले.यावेळी संस्थेचे मानद अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मानद सचिव तथा महारेराचे सदस्य डॉ. विजय सतबीर सिंह तसेच संस्थेचे सदस्य उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंत्रालय इमारतीच्या नुतनीकरणादरम्यान हलविण्यात आलेले संस्थेचे कार्यालय आणि ग्रंथालय तळ मजल्यावर महाराष्ट्र बँक शाखेच्या शेजारी पुन्हा सुसज्ज स्वरुपात साकारण्यात आले आहे. ग्रंथालयाकडे लोकप्रशासन आणि अनुषंगिक विषयावर सुमारे बारा हजारांची ग्रंथसंपदा आहे. संस्थेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी संस्था स्थापनेचा उद्देश आणि वाटचालीसह विविध उपक्रम आणि ग्रंथालयाबाबत माहिती दिली.तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण तसेच फित कापून कार्यालय आणि ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले.भारतीय लोक प्रशासन संस्थेची स्थापना १९५४ मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आली. लोक प्रशासनाशी संबंधित अभ्यास, विचारमंथन आणि संशोधन करून प्रशासनास सहकार्य करण्यासाठी या अराजकीय स्वरुपाच्या संस्थेची निर्मिती झाली आहे.