पुणे : ग्रामीण भागातल्या लोकांचा विकास अधिक जोमाने होण्यासाठी डिजिटल इंडियाने ग्रामीण भागात पोहोचणे गरजेचे आहे. ग्रामीण भारताच्या समस्यांसाठी स्थानिक उपायांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सांगितले. पुणे इथल्या फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित केलेल्या पाचव्या भारतीय विज्ञान संमेलन आणि प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमात ते आज बोलत होते.
राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने हे विज्ञान संमेलन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एम. एम. शर्मा, डॉ. गोविंद स्वरुप आदी मान्यवर उपस्थित होते.
संशोधनामुळे गुंतवणूक आणि देशांतर्गतच्या आवश्यकतेवर राठोड यांनी यावेळी जोर दिला. मेक इन इंडिया अभियानाला पंतप्रधानांकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे संरक्षण उपकरणे निर्मितीमध्ये स्वयंसिद्ध व्हायला भारताला चालना मिळत आहे. ग्रामीण लोकांच्या गरजांनुसार ग्रामीण संशोधन झाले पाहिजे आणि त्यासाठी स्थानिक उपाय शोधले पाहिजे. विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीची सर्व जगाकडून प्रशंसा होत असल्याचे राठोड म्हणाले.