-वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्र ते जयभारत उदंचन केंद्रापर्यंत १.८५७ किमीचे खनन तेरा महिन्यात पूर्णत्वास. टाळेबंदीच्या परिस्थितीवर मात करुन काम पूर्ण.
- प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण. डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
- सन २०५१ पर्यंतचा विचार करुन प्रकल्पाचे बांधकाम, ७२ दशलक्ष लीटर मलजल वाहून नेण्याची क्षमता
- वांद्रे, खार परिसरातील मलजल वाहिन्यांवरील ताण कमी होण्यास मदत
- जयभारत उदंचन केंद्र व चिंबई उदंचन केंद्र बंद होवून देखभाल खर्च वाचणार
वांद्रे आणि खार परिसरातील मलजल वाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱया वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्र ते जयभारत उदंचन केंद्र या सुमारे १.८५७ किलोमीटर अंतराच्या भूमिगत मलजल बोगद्याचे आव्हानात्मक खनन महानगरपालिकेने अवघ्या तेरा महिन्यांमध्ये पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्वात लहान व्यासाचा असा हा मलजल बोगदा असून त्यासाठी ‘अर्थ प्रेशर बॅलन्स टीबीएम’ या बोगदा खनन तंत्रज्ञानाचा देखील प्रथमच उपयोग करण्यात येत आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामध्ये भारतातील सर्वात मोठ्या टीबीएम संयंत्राचा उपयोग करुन वर्षभरात समुद्राखालून बोगदा खनन करण्याची कामगिरी करणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी कामगिरीमध्ये या मलजल बोगदा खनन कामगिरीमुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्र ते जयभारत उदंचन केंद्र या भूमिगत मलजल बोगद्याचे खनन दिनांक ४ डिसेंबर २०२० रोजी वांद्रे केंद्रापासून सुरु करण्यात आले होते. हे काम आज (दिनांक १७ जानेवारी २०२२) म्हणजे तेरा महिन्यांनी पूर्णत्वास आले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२२ पर्यंत संपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे.
मुंबई मलनिःसारण प्रकल्प अंतर्गत हा बोगदा बांधण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण प्रकल्प) या खात्याच्या वतीने हे बांधकाम करण्यात येत आहे. कोविड संसर्ग कालावधीतील टाळेबंदीचा कोणताही परिणाम न होवू देता प्रशासनाने या मलजल बोगद्याचे काम अखंडपणे सुरु ठेवले आहे. सदर मलजल बोगद्याची लांबी १,८५७ मीटर असून त्यांचा अंतर्गत व्यास २.६० मीटर व बहिर्गमी व्यास ३.२० मीटर आहे. भारतातील सर्वात जलहान व्यासाचा असा हा बोगदा आहे. याप्रकारच्या मलजल बोगद्यासाठी भारतात प्रथमच अर्थ प्रेशर बॅलन्स हे तंत्रज्ञान वापरात आणले गेले आहे. जिथे मृदू, ओलसर जमीन असताना वेगाने मात्र तितक्याच सुरक्षित पद्धतीने खनन व बांधकाम करावयाचे असते, तिथे या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो.
सन २०५१ पर्यंतचा विचार करता, भविष्यकालीन सुमारे ७२ दशलक्ष लीटर इतक्या क्षमतेने मलजल वाहून नेण्याची क्षमता समोर ठेवून या प्रकल्पाचे आरेखन, संरचना करण्यात आले आहे. या बोगद्याचे बांधकाम सेंगमेंटल लाईनिंग पद्धतीने करण्यात येत आहे. भविष्यात चिंबई उदंचन केंद्राकडे येणारा मलजल प्रवाह हा या प्रस्तावित मलजल बोगद्यामध्ये घेण्यासाठी माहिम कॉजवे जंक्शन (मदर व सन गार्डन स्टॅच्यू) येथे शाफ्ट देखील बांधले जात आहे.
बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, जय भारत उदंचन केंद्राकडे जाणारा मलजल या बोगद्याच्या माध्यमातून वांद्रे अंतर्गमी उदंचन केंद्र येथे वळविण्यात येईल. परिणामी, वांद्रे, खार परिसरातील मलजल वाहिन्यांवरील ताण कमी होऊन त्यांची क्षमता देखील वाढणार आहे. एवढेच नव्हे तर, भविष्यात जय भारत उदंचन केंद्र व चिंबई उदंचन केंद्र बंद करता येतील, परिणामी त्यावरील देखभालीच्या खर्चामध्ये बचत होईल.
या बोगद्याद्वारे मलजल प्रवाह हा उताराच्या दिशेने (गुरुत्चाकर्षण) वांद्रे अंतर्गामी उदंचन केंद्रापर्यंत पोहोचणार आहे. या संपूर्ण १.८५७ किलोमीटर बोगद्याचे काम करताना मध्ये कुठलीही खोदविहीर (शाफ्ट) न घेता, बोगदा खनन संयंत्र (टीबीएम) द्वारे जलदगतीने करण्यात आले आहे. उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. अजय राठोर, मुंबई मलनिःसारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता श्री. अतुल राव, कार्यकारी अभियंता श्री. संतोष कुलकर्णी, सहायक अभियंता श्री. राजेश पाटील, दुय्यम अभियंता श्री. राहूल अहिरे आणि श्रीमती प्रणाली धामणस्कर व सहकारी कर्मचारी, कामगार या प्रकल्पामध्ये योगदान देत आहेत.
प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड हे असून मेसर्स आय.टी.डी. सिमेंटेशन इंडिया लिमिटेड हे कंत्राटदार आहेत.