हिम्मत असेल तर उघडपणे या, मी उघडपणे फिरत असतो – खा. राऊतरत्नागिरी, प्रतिनिधी : भारताचा कायदा कसा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. भारताचा कायदा कसा असतो हे राणेंना पुन्हा एकदा दिसून आलेलं असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेली आहे. ते आज चिपळूणमध्ये बोलत होते.
यावेळी खा. राऊत म्हणाले की, आजपर्यंत नारायण राणेंना 302, 326, 337 यापलीकडे त्यांना काही माहीत नव्हतं, कारण आजपर्यंत त्यांनी या कलमांचा वापर करून अनेकांचे जीव घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांना तेवढंच माहिती होतं. त्याहीपलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने वागायला पाहिजे, त्याची जबाबदारी काय असली पाहिजे, हे कालच्या कायद्याने त्यांना शिकवलेलं आहे.
न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत, त्याच्यापासून त्यांना शहाणपण सुचलं पाहिजे अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.
केंद्र आणि सरकारमधलं अंतर अजिबात वाढलेलं नाही. नारायण राणेंच्या वक्तव्याची लेखी तक्रार काल मी पंतप्रधानांकडे केलेली आहे. अर्ध्या तासाच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घेतली. त्यांच्या कार्यालयाने मला कळवलं की ही तक्रार आम्ही गृहमंत्र्यांकडे पाठवलेली आहे, तुम्ही त्याचा फॉलोअप करा. दरम्यान आपल्या तक्रारीची दखल पंतप्रधानांनी गांभीर्याने घेतली. भाजपला या यात्रेच्या माध्यमातून नारायण राणे यांच्या रूपाने पणवती लागलेली असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.
खा. विनायक राऊत यांच्या घरावर बाटल्या आणि दगड फेकणाऱ्यांबद्दल राऊत म्हणाले की, काळोखातून काहिजण दगड आणि बाटल्या फेकून गेलेले आहेत. हिम्मत असेल तर उघडपणे या मी उघडपणे फिरत असतो. अशी नौटंकी करणार्याना आम्ही भीक घालत नाही, असं आव्हान राऊत यांनी यावेळी दिलं.















