डोंबिवली, (प्रशांत जोशी) : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या अन्याय्यकारक दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालक तसेच नागरिक मेटाकुटीला आले आहेत. विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापूर्वी देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ येतील म्हणून विश्वास दिला होता. मात्र गेल्या चार वर्षात वाढती महागाई व बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापारी वर्गाने या बंदला पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवली त्यामुळे बंद यशस्वी झाला असा दावा विरोधक करीत आहेत.
पेट्रोलचे आणि डिझेलचे दर भरमसाट वाढले असून घरगुती वापराच्या अनुदानित गॅस सिलेंडरचे दर ४०० वरून ७५० रुपयांवर पोहोचल्यामुळे व्यापारी, वाहनचालक यांच्यासह सर्वसामान्य नागरिक समस्याग्रस्त झाले आहेत. सरकारने ताबडतोब पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करीत काँग्रेसने भारत बंदचे आवाहन केले. विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, बसपा आणि मनसे यांनी आजच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला.
बंद दरम्यान व्यापाऱ्यांनी व हॉटेल व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते. इंधन दर वाढीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षा चालकांनी स्वतः बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, बसपाचे नेते व कार्यकर्ते एकत्रित रस्त्यावर उतरले होते. पूर्वेकडील इंदिराचौकात सर्व विरोधी पक्षाची नेतेमंडळी तसेच पदाधीकारी व कार्यकर्ते यांनी बंद यशस्वी करण्यासठी डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात गर्दी केली होती. कॉंग्रेस स्थानिक नेते गंगाराम शेलार, संतोष केणे, रवी पाटील, नवीन सिंग, अमित म्हात्रे, नगरसेवक नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक जितेंद्र (जीतू) भोईर, शारदा पाटील, माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे पदाधीकारी व कार्यकर्ते मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, विरोधीपक्षनेते मंदार हळबे, पालिकेतील गटनेते प्रकाश भोईर, महिला अध्यक्षा मंदा पाटील, नगरसेविका सरोज भोईर, शहर संघटक तथा परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे आदींच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरातील इंदिरा चौकात रास्ता रोको करून आणि निदर्शने करून वाहतूक बंद पाडली. कम्युनिस्ट पक्षाचे नेते काळू कोमास्कर यांच्या नेतृत्वाखाली लालबावटा रिक्षा युनियनने रिक्षा बंद ठेऊन बंदचे समर्थन केले.
या बंदमधून शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी वगळण्यात आले होते. पालिका परिवहनच्या बस धावत होत्या. रिक्षा व इतर खाजगी वाहनांची वाहतूक तुरळक प्रमाणात सुरु होती. आंदोलनामुळे जनतेचे, व्यापारी वर्गाचे, सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेत भारत बंद शांततेत पार पडला. बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.