मुंबई : डिजिटायझेशनकडे यशस्वी वाटचाल करण्याच्या दृष्टीकोनातून, इंडिया पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आपल्या डिजिटल पेमेंट्स व्यासपिठावर भारत पे कार्ड या नवीन उत्पादनाचे सादरीकरण केले आहे. पेटीएम, एम-पेसा आणि बिल डेस्क या आधीच यशस्वीरित्या सुरू असलेल्या ई-पेमेंट्स पर्यायांसह इंडिया पॉवरने भारत पे कार्ड आणून सोप्या पेमेंट पर्याय उपलब्ध केला आहे.
भारत पे कार्डच्या अनावरणप्रसंगी, मगध येथील विभागीय आयुक्त जितेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांच्यासह अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश श्याम किशोर झा, वरीष्ठ न्यायालयीन सल्लागार संतोष कुमार, भारत पे कार्डचे सीईओ अमरीश पारिख आणि इंडिया पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीईओ संजीव सेठ उपस्थित होते.
डिजिटल पेमेंट्सच्या मोहिमेतील आमचे हे आणखी पुढचे पाऊल आहे. पेमेंट्सची प्रक्रिया यामुळे अधिक सोपी होणार आहे, असे इंडिया पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे सीईओ संजीव सेठ यांनी सांगितले.
डिजिटल पेमेंट्स सुविधेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी आयपीसीएलतर्फे ग्राहकांसाठी लकी ड्रॉही घोषित करण्यात आला आहे. भारत पे व्यासपिठाच्या माध्यमातून बिले भरणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येईल. तसेच, विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही जाहीर करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत पे कार्डातून पैसे काढून घेण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध होत आहे.