मुंबई, १ जुलै, २०२२ : भारतातील पेट्रोलियम क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (बीपीसीएल) बीना येथील आपली रिफायनरी उपकंपनी, ‘भारत ओमान रिफायनरीज लिमिटेड’ (बीओआरएल) हिचे स्वतःमध्ये विलीनीकरण करीत असल्याची घोषणा आज येथे केली.
हे विलीनीकरण दोन्ही कंपन्यांना परस्पर फायद्याचे ठरेल, अशी अपेक्षा आहे. ‘बीपीसीएल’ आणि तिच्या समूह कंपन्यांची तेल आणि वायू उद्योगात उत्खनन, शुद्धीकरण आणि उत्पादन व वितरण या मूल्य साखळीमध्ये लक्षणीय उपस्थिती आहे, तर ‘बीओआरएल’ ही पाइपलाइनच्या नेटवर्कद्वारे उत्तर आणि मध्य भारतात उत्पादन सुरक्षा आणि लॉजिस्टिक्सचे लाभ प्रदान करते. बीना रिफायनरी ही ‘बीपीसीएल’साठी मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाची कंपनी आहे.
याशिवाय कच्च्या तेलाच्या खरेदीतील खर्चाचे इष्टतमीकरण, खनिज तेलाच्या साठा निवडीतील लवचिकता, उत्पादनाच्या नियोजनाचे / उत्पादन मिश्रणाचे रिफायनरीजसाठीचे इष्टतमीकरण यातून खनिज तेलाच्या खरेदीतील काही प्रमुख फायदे ही कंपनी घेते.
या विषयावर बोलताना अरुण कुमार सिंग म्हणाले, “उर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असताना, त्यात आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि भविष्यातील वाढ व शाश्वतता साध्य करण्याकरीता व्यवसायात वैविध्य आणण्यासाठी ‘बीपीसीएल’ने काही निश्चित योजना तयार केल्या आहेत. बीना रिफायनरीच्या विलीनीकरणातून आम्ही वेगाने बदलणाऱ्या ऊर्जा बाजारपेठेत अधिक प्रभावीपणे आणि फायदेशीरपणे स्पर्धा करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करू.”
बीना रिफायनरीला ‘बीपीसीएल’च्या मार्केटिंग नेटवर्कमध्ये आपली उत्पादने आणण्यास खुली परवानगी असेल. ‘बीना रिफायनरी’कडे मोठ्या जमिनींची उपलब्धता आहे. त्या जागांवर अपारंपरीक उर्जेचे अनेक ऊर्जा प्रकल्प, १.२ एमएमटीपीए क्षमतेचे इथिलीन क्रॅकर युनिट आणि पेट्रोकेमिकलसंबंधी पायाभूत सुविधा यांचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रकल्प किफायतशीर असल्याने विलीनीकरणानंतर त्यांच्यावरील आर्थिक बोजा लवकर कमी होईल. याव्यतिरिक्त, ‘बीपीसीएल’च्या सहाय्यक यंत्रणेमध्ये, व्यावसायिक प्रक्रियेमध्ये आणि टॅलेंट पूलमध्येदेखील या प्रकल्पांचा समावेश असेल.
मुंबई, कोची आणि बीना येथील भारताच्या पेट्रोलियमच्या रिफायनरीजची एकत्रित शुद्धीकरण क्षमता सुमारे ३५.३ एमएमटीपीए इतकी आहे. तिच्या विपणनसंबंधीच्या पायाभूत सुविधांमध्ये स्थापना, डेपो, रिटेल आउटलेट्स, विमान सेवा केंद्रे आणि एलपीजी वितरकांचे नेटवर्क समाविष्ट आहे. तिच्या वितरण नेटवर्कमध्ये २० हजार रिटेल आउटलेट्स, ६१००हून अधिक एलपीजी वितरक, ७३३ ल्युब्स डिस्ट्रिब्युटरशिप, १२३ पीओएल स्टोरेज लोकेशन्स, ५३ एलपीजी बॉटलिंग प्लॅंट्स, ६० एव्हिएशन सर्व्हिस स्टेशन्स, ३ ल्यूब ब्लेंडिंग प्लॅंट्स आणि ४ देशांमधून जाणारी पाईपलाईन यांचा समावेश आहे.
बीना रिफायनरी ही एक बहुउपयोगी रिफायनरी असून तेथे ४७ प्रकारच्या खनिज तेलांवर प्रक्रिया करण्यात येते. अलीकडेच या रिफायनरीमध्ये खनिज टर्पेन्टाइन तेलाचे उत्पादनदेखील सुरू करण्यात आले आहे. ‘इंटिग्रेटेड फुल कन्व्हर्जन हायड्रोक्रॅकर’ आणि ‘डिझेल हायड्रो-ट्रीटर’ यांची उभारणी येथे झालेली आहे. अशा प्रकारचे हे भारतातील पहिले आणि बॅरेलचे ‘बॉटम्स अपग्रेड’ करण्यासाठीचे ‘डिलेड कोकर युनिट’ आहे.