मुंबई : काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षातर्फे सोमवार, १० सप्टेंबर २०१८ रोजी भाजपा सरकारने पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅसच्या दरांमधील केलेल्या भरमसाठ दरवाढी विरोधात आणि प्रचंड वाढलेल्या महागाई विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनता दल (शरद यादव), CPI, CPI (M), PWP, शेतकरी कामगार पक्ष, रिपाई (जोगेंद्र कवाडे गट), राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष अशा सर्व भाजपा विरोधी पक्षांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे तसेच सर्व संलग्न कामगार संघटनांनी भारत बंदला समर्थन दिले आहे. बँक युनियनचा पाठिंबा असल्याने बँका, इन्शुरन्स कंपनी, पेट्रोल पंप असोसिएशन, आहार संघटना आणि मुंबईतील २७ मोठ्या मार्केटचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यामुळे १०० टक्के भारत बंद यशस्वी होईल, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, मनापा विरोधी पक्ष नेते रावी राजा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि महिला अध्यक्षा डॉ अजंता यादव उपस्थित होते.
संजय निरुपम पुढे म्हणाले की संपूर्ण देशामध्ये सर्वात महाग पेट्रोल व डीझेल महाराष्ट्रात मिळत आहे. पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्व स्तरावर महागाईच्या रूपाने त्यांचा परिणाम होत आहे. संपूर्ण जनता त्रस्त झालेली आहे. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीमध्ये आणण्यासाठी आम्ही वारंवार मागणी करत आहोत पण हे भाजपा सरकार जीएसटीमध्ये आणत नाही आहे. जर पेट्रोल व डिझेलला जीएसटी मध्ये आणले, तर ५० % स्वस्त दराने सर्व जनतेला मिळेल, परंतु हे सरकार जनतेची पिळवणूक आणि लुट करत आहे. भरमसाठ अशा अनेक कराच्या (TAX) रूपाने ११ लाख कोटी सरकारने कमावलेले आहेत. एक्साईज ड्युटी, कृषी कल्याण सेस, दुष्काळ सेस असे २७ ते २८ टक्के विविध कर लावण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असताना हे सरकार दुष्काळाचा कर कशी काय लावू शकते ? हे मला कळत नाही. आम्ही हा बंद जनतेसाठी करत आहोत. संपूर्ण जनतेच्या मनात भाजपा सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालेला आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, सोमवारी १० सप्टेंबरला कोणी हि घरातून बाहेर पडू नये. कामाला जाऊ नये आणि महागाई विरोधातील आमच्या बंदला पाठिंबा द्यावा. शाळा कॉलेजेस, हॉस्पिटल आणि अत्यावश्यक सेवेला आमच्याकडून बाधा आणली जाणार नाही. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन जनतेच्या हितासाठी शिवसेना आणि मनसेला सुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांनी या बंदला पाठिंबा द्यावा. आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची या पक्षातील नेत्यांशी चर्चा सुरु आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणलं पाहिजे. आज 22 राज्यात भाजपचं सरकार आहे, जर या सरकारची इच्छाशक्ती असेल तर निर्णय घेऊ शकतात पण यांची इच्छाच नाही. पेट्रोलवरच्या एक्ससाईजचा दर ८ रु प्रति लिटर होता. आज तो १९ रुपये प्रति लिटर आहे. दुष्काळ सेसचे नाव बदलून आता दुसऱ्या नावाने सेस वसूल केले जात आहे. सगळ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन रस्त्यावर सन्नाटा होऊ द्या, या सन्नाट्याची ताकद काय असते हे नरेंद्र मोदींना कळू द्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकजुटीची हाक देतायत त्यामुळे ते या बंदला पाठींबा देतील, अशी अपेक्षा आहे. भाजपा सरकारला धक्का देण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ही सुवर्ण संधी आहे. आर्थिक राजधानी बंद झाली तर देश बंद झाल्याचे चित्र जाईल, असे उद्गार नवाब मलिक यांनी काढले.
भाजपा आमदार राम कदम प्रकरणावर संजय निरुपम म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री देखील आहेत परंतु ते या संपूर्ण प्रकरणावर चकार शब्द काढत नाही आहे. ते त्यांना पाठीशी घालत आहेत. हि फार चुकीची गोष्ट आहे. वास्तविक राम कदम यांना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. त्यांचा ताबडतोब राजीनामा घेतला गेला पाहिजे परंतु तसे न होता त्यांच्यावर कोणतीहि कारवाई होत नाही आहे. गेले पाच दिवस आमच्या महिला कार्यकर्त्यांनी घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले, पाठपुरावा केला, तेव्हा कुठे साधी NC केसची नोंद करण्यात आलेली आहे. राम कदम यांचे गुंड एबीपी माझाच्या कार्यालयात वारंवार फोन करून पत्रकारांना व महिला पत्रकारांना धमक्या आणि शिवीगाळ करत आहेत. याचा मी निषेध करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या गुंडांना शोधून काढून त्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे.