रत्नागिरी (आरकेजी): देशात डिझेल- पेट्रोल महागाई विरोधात भारत बंद पुकारण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात या बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. बाजारपेठांमधील दैनंदिन व्यवहार दुपारनंतर सुरळीत होता.
गेल्या पंधरा दिवसात इंधन दरवाढीने प्रचंड उच्चांक गाठला आहे, नजीकच्या काळात पेट्रोलचे दर शंभरी गाठतील. यामुळे सर्वसामान्यांचे जीवनच मेटाकुटीला आहेत पण राज्य आणि केंद्र सरकारला याची फिकीर नाही उलट निलाजरपणे समर्थन केले जात आहे असं म्हणत राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने रत्नागिरी जिल्हा बंद पुकारला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही या बंदला पाठींबा दिला होता. रत्नागिरीत काढण्यात आलेल्या मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान काँग्रेस भवनपासून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये विधान परिषद आमदार हुस्नबानो खलिफे, अशोक जाधव राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुझा, राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये तर मनसेचे सुनील साळवी, छोटू चव्हाण यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बविआचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये त्या ठिकाणच्या प्रांत, तहसीलदार यांना विरोधकांकडून निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान या बंदचा बाजारपेठांवर काही परिणाम झालेला होता. बाजारपेठामधील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु होते. तर एसटी सेवाही सुरळीतपणे सुरु होती.