मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीमुळे राज्यात आणि मुंबईत भीषण परिस्थिती आहे. संचार बंदीमुळे कामधंदाच बंद झाला असून रोजंदारीवर वा रोजच्या कमाईवर जगणाऱ्या गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गरजू आणि गरिबांच्या मदतीसाठी हजारो हातही पुढे आले. जनता दलानेही मदतीसाठी सक्रिय सहभाग घेतला आहे. भांडुप पश्चिमेत जनतेसाठी जनता दल कार्यरत झाली आहे.
ईशान्य मुंबई जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजीवकुमार सदानंद आणि त्यांचे सहकारी मलिका दुरई, रिक्षा संघटनेचे धोंडीराज, तसेच प्रविण, शिवकुमार, अॅन्थनी दास, मिहीर, कार्तिक कोनार आदींनी प्रसंगी धोका पत्करत रस्त्यावर उतरून भांडुप पश्चिम परिसरात गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे केला.
सुरूवातीला परिसरातील गरजूंना शिधा देण्यात आला, ३००हून अधिक कुटुंबाना याचा लाभ मिळाला. नंतर पक्षातर्फे तयार जेवणाचे पॅकेट पुरविण्यास सुरुवात करण्यात आली. जवळपास आठ दिवस रोज साधारण ४०० लोकांना जेवण देण्यात येत होते. कुटुंबापासून दूर आणि एकट्या राहणाऱ्या कामगारांची त्यामुळे मोठी सोय झाली.
या कामासाठी संजीवकुमार सदानंद यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या कृष्णन सदानंदन एज्युकेशन ट्रस्टचीही मोठी मदत झाली. या कामाची राज्य सरकारच्या पातळीवरही दखल घेतली गेली आहे. कारण भांडुप परिसरातील रहिवाशांना धान्य वितरित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने या ट्रस्टकडे विचारणा केली होती.
त्यानुसार ट्रस्टच्या वतीने अन्न महामंडळाकडे प्रत्येकी एकेक हजार किलो गहू व तांदळाची मागणी नोंदविण्यात आली होती. तसेच अपना बाजार कडे प्रत्येकी ३०० किलो डाळ व खाद्य तेलाची मागणी नोंदविण्यात आली होती. हे साहित्य येऊन पोहोचले असून यातून साधारण ३०० कुटुंबांना प्रत्येकी तीन किलो तांदूळ व गहू, तसेच एकेक किलो डाळ व तेल यांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे नेते सुहास बने, प्रभाकर नारकर सलीम भाटी यांनी दिली.