रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): घरात शिरलेल्या बिबट्याची वनविभागाने तब्बल सात सातानंतर सुटका केली आहे. हि घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड दैत्यवाडी इथं घडली आहे. हा बिबट्या मादी असून चार वर्षाची आहे. तिला पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहीती वनविभाागाचे वनपाल विलास गुरवळ यांनी दिली.
कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेले सोमा गंगाराम शिवगण यांची पत्नी सुषमा सोमा शिवगण आणी मुलगी स्वाती सोमा शिवगण या दोघी मायलेकी लांजा तालुक्यातील पुर्व भागातील भांबेड- दैत्यवाडी येथे असलेल्या त्याच्या घरी वास्तव्यास असतात. रविवारी रात्री ११. ३० वाजता या माय-लेकीं जेवुन झोपण्याच्या तयारीत असताना घराच्या मागच्या भागातील पडवीत असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यातून कोंबड्यांचा मोठ्याने आवाज येऊ लागला. एवढ्या रात्री कोंबड्या का? ओरडतात म्हणुन त्या दोघी पाहण्यासाठी गेल्या असता खुराड्यात त्यांना बिबट्या असल्याचे पहावयास मिळाले. बिबट्याला पाहुन त्या दोघींची अक्षरशा बोबडी वळाली. तरी धीर करुन त्यानी खुराड्याचा दरवाज्या बंद करुन घेतला. दरवाज्या बंद केल्याने खुराड्यात असलेला मादी बिबट्या कैद झाला. यानंतर आरडाओरडा करुन त्यानी आजु-बाजुच्या लोकांना जमविले. त्यानंतर भांबेडचे वनरक्षक विक्रांत कुंभार यांना याबाबत कळविण्यात आले.त्यांनी याची माहिती वनपाल विलास गुरवळ यांना दिली.ताबडतोब वनक्षेत्रपाल बी.आर.पाटील, वनपाल विलास गुरवळ यांनी पाहणी करुन सकाळी 6 वाजता पिंजरा लावला. पिंजऱ्याच्या माध्यमातून सोमवारी सकाळी १० वाजता बिबट्याला पकडण्यात आले.
पकडण्यात आलेल्या बिबट्या हा मादी आहे. अंदाजे या मादीचे वय किमान ४ वर्षे असुन लांबी 175 से.मी.तर उंची 65 से.मी असल्याचे वनपाल विलास गुरवळ यांनी सांगितले. कोंबड्यांना खाण्यासाठी ही मादी खुराड्यात शिरली. मात्र खुराड्याचा दरवाज्या बंद केला गेल्याने ही मादी या खुराड्यात कैद झाली होती. रात्रभर खुराड्यात ही मादी अडकुन पडल्याने तील पकडणे शक्य झाले. पकडल्यानंतर या मादी बिबट्याला वनविभागाच्या संरक्षित जंगलात सोडण्यात आले आहे.
मादी बिबट्याला पकडण्यासाठी, वनक्षेत्रपाल बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विलास गुरवळ ,भांबेड वनरक्षक विक्रांत कुंभार, पाली वनपाल लक्ष्मण गुरव, राजापुर वनपाल राजश्री कीर, वनरक्षक एन. एस. गावडे, एस. वी. गोसावी, दिलिप आरेकर, अरविंद मांडवकर, डी. आर. कोल्हेकर, प्राणी मित्र सागर वायंगणकर यानी सहभाग घेतला होता.