रत्नागिरी : पावसाच्या अडथळ्यावर मात करण्यासाठी भाजीच्या लिलाव प्रक्रिया जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आंबा लिलावगृहात होणार आहेत, याचा शुभारंभ सभापती दत्तात्रय ढवळे यांच्या उपस्थितीत सोमवारी(ता.२४) करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला लाखो रुपयांच्या भाजीचा लिलाव होतो. लिलाव प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी बाजार समितीने आवारात जागा उपलब्ध करुन दिली आहे. भाजीचा साठा करण्यासाठी जागा दिलेली आहे. तिथे छत आहे पण आजूबाजूचा भाग मोकळा आहे. भाजीच्या पोती तिथे ठेवल्यावर त्या पावसाळ्यात भिजतात. त्यामुळे व्यापार्यांचे नुकसान होते. गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न तेथील अडतदार, व्यापारी आणि शेतकरी यांनी बाजार समिती सभापती ढवळे यांच्यापुढे मांडला होता.
संचालक मंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर सभापती ढवळे यांनी बाजार समितीच्या नुतन लिलावगृहात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोमवारी सभापती ढवळे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संदीप सुर्वे, आशालता सावंतदेसाई, किरण महाजन, दिगंबर शिंदे, कर्मचारी, अडतदार रूपेश पेडणेकर, शांताराम झोरे, सुरेश झोरे, गंगाराम शेळके, भाजी व्यापारी, शेतकरी व हमालवर्ग उपस्थित होते.